Home संपादकीय अग्रलेख ‘बहुगुणी’ बहुगुणा

‘बहुगुणी’ बहुगुणा

2

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका असोत, या निवडणूक काळात विविध पक्षांतील कार्यकर्ते, नेते दुस-या पक्षात जातात. हे तसे नवल नाही. प्रत्येक व्यक्तीला सत्तेच्या जवळ जाण्याच्या इच्छा-आकांक्षा असतात. त्यानुसार ते असे पाऊल उचलतात.

त्यात पक्षनिष्ठा वगैरे असा काही भाग नसतो, असतो तो निव्वळ स्वार्थ. या स्वार्थातून मिळणारे विविध लाभ. हे सगळं लांबण लावायचे कारण की, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा रिटा बहुगुणा यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. बहुगुणा हे कुटुंब काँग्रेसची संस्कृती मानणारे म्हणून ओळखले जाते. काँग्रेसचे एकेकाळचे नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांचा राजकीय वारस म्हणून रिटा बहुगुणांकडे पाहिले जात होते. त्यांचे कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रिटा बहुगुणा यांना उत्तर प्रदेशची धुराही दिलेली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकाही लढवण्यात आलेल्या होत्या. पण त्यात कॉंग्रेसला धवल यश काही मिळवता आलेले नाही. मुळात रिटा बहुगुणा या तडफदार नेत्या कधीच नव्हत्या. पण तरीही त्यांचे कुटुंब काँग्रेस संस्कृतीशी एकरूप झालेले असल्याने रिटा बहुगुणा यांच्यात उपजत नेतृत्व गुण नसले तरी त्यांना काँग्रेसने मोठे केले, हे नाकारून चालणार नाही. रिटा बहुगुणा यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण असे सांगितले जाते की, येणा-या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी शीला दीक्षित यांचे नाव पुढे केल्याने त्या नाराज होत्या. वास्तविक शीला दीक्षित यांचा संसदीय लोकशाहीचा अनुभव दांडगा आहे. इंदिरा गांधींच्या काळापासून दीक्षित राजकारणात सक्रिय आहेत. अनुभवी व कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारी अशी त्यांची पक्षात प्रतिमा आहे. त्यामुळे आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाकडून ब्राह्मण कार्ड चालवणे जाणार असल्याने काँग्रेसने त्यापूर्वीच दीक्षित यांचे नाव पुढे केल्याने भाजपाची कोंडी झाली. त्यातूनच त्यांना आणखी एक चेहरा पाहिजे होता. तो रिटा बहुगुणा यांच्या माध्यमातून मिळाल्याचे भाजपामध्ये बोलले जाते. त्यामुळे येत्या काळात भाजपा आणखी काय खेळ खेळते हे पाहण्यासारखे आहे. पण काँग्रेसच्या एका नेत्याला भाजपात आणल्याचा आनंद भाजपाच्या नेत्यांच्या चेह-यावर आहे. तो कायम टिकेल, असेही सांगता येत नाही. त्यातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा हे यापूर्वीच भाजपात दाखल झाल्याने रिटा बहुगुणा यांनी काँग्रेस सोडल्याने फारसा फरक पडेल, असे चित्र सध्या तरी नाही. कारण आपल्या नावावर निवडणुका जिंकणे एवढा काही त्यांचा वकूब नाही.

रिटा बहुगुणा यांच्या पक्ष बदलामुळे कोणताही पक्षाचा कार्यकर्ता, नेता त्या त्या पक्षाशी प्रामाणिक राहू शकत नाही, असाच संदेश गेलेला आहे. मुळात सत्ताकांक्षा हा मानवी स्वभाव आहे. त्यात राजकारणी असतील तर त्यांना सत्तेशिवाय करमत नाही. रिटा बहुगुणा याही सत्तेच्या परिघात गेल्या अनेक वर्षापासून वावरत होत्या. त्यामुळे त्यांच्या सत्ताकांक्षा जागृत होऊन त्यांनी थेट भाजपात प्रवेश घेतला त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. बिस्मार्क याने, ‘राजकारण हे शक्य-अशक्यतांचा खेळ असते’ असे म्हणून ठेवलेले आहे. ते खरेही आहे. पण या शक्य, अशक्यतांच्या खेळात जो कार्यकर्ता, नेता अनेक र्वष पक्षाशी प्रामाणिक राहून काम करतो, ब-याचदा पदेही उपभोगतो. पण जेव्हा त्याच्या हाती काही पद नसते, परंतु राजकीय महत्त्वाकांक्षा बळकट असते, तेव्हा तो मूळचा पक्ष सोडून दुस-या पक्षांशी सोयरिक करतो. त्यावेळी त्याची पक्षनिष्ठा फोल ठरते. रिटा बहुगुणाच्या निमित्ताने येत्या उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे पक्ष पर्यटन पदोपदी पाहावयास मिळणार आहे.

एखादा राजकीय नेता दुस-या पक्षात जातो तेव्हा त्याच्या कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न असतो. अनेकदा जो नेता दुस-या पक्षात जातो, तिथे त्याला ‘उपरा’ अशीच वागणूक मिळते. पक्ष सोडून दुस-या पक्षात जाणारा असा नेता, त्या पक्षातील इच्छुकावरही अन्याय करीत असतो. त्याचा येनकेन प्रकारेन फटका त्या त्या पक्षास मिळतो. बहुगुणा यांनी भाजपात प्रवेश केला म्हणून भाजपाचे सगळेच कार्यकर्ते, नेते खूश असतील, असे काही नाही. त्यांनी खूश का असावे? आयुष्यातील अनेक र्वष एखादा कार्यकर्ता, नेता पक्षासाठी खर्ची घालतो तेव्हा त्याच्याही काही इच्छा, आकांक्षा असतात. त्या अशा पक्ष पर्यटन करून आलेल्यांमुळे पूर्ण होत नाहीत. त्यांच्या इच्छा-आकांक्षांना सुरुंग लागतो. अशा सर्व पार्श्वभूमीवर रिटा बहुगुणा यांना भाजपा कार्यकर्ते किती सांभाळून घेतात, हे पाहण्यासारखे आहे.

विन्स्टन चर्चिल यांनी भारताने लोकशाही प्रणालीचा अवलंब केल्यावर एक दर्पोक्ती केली होती. तेव्हा ते म्हणाले होते- ‘लोकशाही ही चांगली प्रणाली आहे. पण भारतातील उन्मत्त सत्ताधारी त्या प्रणालीचा अवलंब करण्यास पात्र ठरणार नाहीत. त्यांच्या उन्मत्तपणामुळेच ही प्रणाली लयास जाईल’ चर्चिलने केलेल्या दर्पोक्तीतील सगळ्याच गोष्टी काही ख-या ठरल्या नाहीत. पण त्यांनी जी धोक्याची घंटा वाजवलेली होती, त्यातील काही भाग खरा ठरत आहे, हे नाकारता येणार नाही. भारताने लोकशाही प्रणालीचा अवलंब केला. त्यानुसार निवडणुकाही होतात. पण घटनेस अभिप्रेत असलेली लोकशाही रुजवण्यास आपण पात्र ठरलो का? तर त्याचे उत्तर नाही, असेच द्यावे लागेल. भारतीय लोकशाही प्रणाली ही जगातील एका आदर्श प्रणाली आहे, पण या प्रणालीचा अवलंब करणारी मंडळीच तिला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे खेदाने बोलावेसे वाटते. कोणतीही निवडणूक ही पैशाशिवाय लढवता येत नाही, ही त्यातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. निवडणुका म्हटल्या की अनेक कार्यकर्ते, नेते यांचे राजकीय स्वार्थ जागे होतात. त्यातून मग असलेला पक्ष सोडून दुस-या पक्षांत शिरण्याचे प्रयत्नही सुरू होतात. रिटा बहुगुणा हे त्यातील वानगीदाखल एक उदाहरण आहे. त्यामुळे लोकशाही प्रणालीला लागलेल्या या किडेचा नायनाट करण्याची आवश्यकता आहे. निवडणूक प्रणाली अधिक लोकाभिमुख करण्यासाठी दिनेश गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने अनेक चांगल्या सुधारणा सुचवलेल्या होत्या. त्यातील एक व महत्त्वाची सूचना ही होती की, एखादा नेता किंवा कार्यकर्ता दुस-या पक्षात निवडणुकीच्या काळात गेला तर त्याला दहा वर्ष निवडणूक लढवताच येऊ नये. पण या समितीने सुचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी कोणत्याच पक्षाने केली नाही. त्यामुळे येत्या काळात लोकशाहीतील महत्तम असणारी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी एकजूट दाखवली पाहिजे. त्यात पहिली गोष्ट ही केली पाहिजे की, निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांला, नेत्याला पक्षात प्रवेश देऊ नये. तसे झाले तर निवडणुकीच्या तोंडावर मूळचा पक्ष सोडून येणा-या हवशे-नवशे यांच्यावर चाप बसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्याच निवडणुका एकाच दिवसात व्हाव्यात यासाठी आग्रही आहेत. पण त्यापूर्वी त्यांनी पक्ष पर्यटन करणा-यांना काही र्वष निवडणूक लढवताच येणार नाही, याबाबतचे विधेयक संसदेत मंजूर करून घ्यावे. मग पाहा देश कसा सुतासारखा सरळ होतो की नाही ते! कोणताही पक्ष हा विशिष्ट विचारसरणीनुसार काम करीत असतो. त्यांची विचारसरणी प्रत्येकाला पटत असेलच असे नाही. काहींना त्या पटतात. त्यामुळे ते त्या पक्षासाठी काम करतात. मग निवडणुकीच्या दरम्यान पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही असे लक्षात येतात, असे हे कार्यकर्ते, नेतेमंडळी पक्ष सोडायलाही कमी करीत नाहीत. हा त्यांच्याकडून करण्यात येणारा द्रोह असतो. जो नेता, कार्यकर्ता त्याच्या मूळच्या पक्षाशी एकनिष्ठ नाही, तो दुस-या पक्षाशी कसा एकनिष्ठ राहील. याचा सगळ्याच पक्षांनी खोलाच जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपाने उप-यांना तिकिटे देऊन निवडून आणले. पण त्यांच्यामुळे पक्षात अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता, नेता खितपत पडला त्याचे काय? त्याने आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? खांबावर चढून पताका, झेंडेच लावायचे का? निवडणुकीच्या सभांसाठी माणसे गोळा करायची का? निवडणुकीत हाणामा-या करायच्या का? प्रचारात उपरणे, टोप्या घालून उन्हात आरोळ्याच देत फिरायचे का? रिटा बहुगुणा या भाजपात गेल्या. त्यामुळे त्यांचे राजकारण ‘बहुगुणी’ ठरेल, असे समजण्याचे काहीच कारण नाही. जनता सगळे लक्षात ठेवते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version