Home संपादकीय अग्रलेख फडणवीसशास्त्री, काढा कुंडल्या बाहेर..!

फडणवीसशास्त्री, काढा कुंडल्या बाहेर..!

1

देवेंद्रपंत गंगाधर फडणवीसशास्त्री वर्षा बंगल्यावर पोपटाचा पिंजरा घेऊन बसले आहेत. पोपट त्यांच्या हातावर आहे आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या कुंडल्या या पिंज-यात ठेवलेल्या आहेत.

फडणवीसशास्त्रींनी या पोपटाला एकेकाची कुंडली उचलून आणायला सांगितली की एकेकाची कुंडली हा पोपट आपल्या चोचीत घेऊन येणार आणि मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार. मग महाराष्ट्राचा कायम अमरपट्टा घेऊन मुख्यमंत्रीपदावर बसलेले देवेंद्रशास्त्री त्या कुंडलीनुसार विरोधकांचे नाक दाबण्याचा कार्यक्रम सुरू करणार. सध्या त्यांनी अशा कुंडल्यांचा गठ्ठा आपल्या हातात घेऊन महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला धमकावायला सुरुवात केलेलीच आहे आणि भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीत या फडणवीसशास्त्रींनी समस्त भाजपावासीयांना आश्वासन दिले आहे की, ‘काळजी करू नका. कोणते अस्त्र कधी बाहेर काढायचे आणि कोणाविरुद्ध वापरायचे हे मला चांगले कळते, त्यामुळे मराठा मोर्चालाही घाबरू नका आणि विरोधी पक्षालाही घाबरू नका. सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत’.

फडणवीसशास्त्री आपल्या धमकीवजा भाषणावर जाम खूश झाले. दानवेंपासून तावडेंपर्यंत सगळय़ांनी टाळय़ा वाजवल्या. त्यामध्ये ४० कोटींचा घपला करणारे, वैद्यनाथ बँकेला फसवणारे, लातूरच्या कोर्टात खटला दाखल झालेले संभाजी पाटील-निलंगेकर नावाचे मंत्रीही होते. तसेच ‘लोकमंगल’च्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतक-यांना फसवून ७२ कोटींचा घोटाळा करणारे सहकारमंत्री सुभाष देशमुखही होते. राजकुमार रावळ होते. जेवढे जेवढे भ्रष्ट मंत्री आहेत, आरोप झालेले मंत्री आहेत, ज्यांच्यावर सीबीआयचे गुन्हे आहेत, सेबीचे गुन्हे आहेत, पोलीस ठाण्याचे गुन्हे आहेत, अशा सगळय़ा भ्रष्ट मंत्र्यांना एकदम शांत वाटले. चला, आपली कुंडली मुख्यमंत्र्यांनी आता पेटीत बंद करून ठेवली आणि विरोधी पक्षाच्या कुंडल्या बाहेर काढल्या. जगाच्या पाठीवरील हा असा नरपुंगव आता महाराष्ट्रातील समस्त विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करून त्रिकालबाधित मुख्यमंत्री राहणार. मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकताना चंद्रकांतदादा पाटील जरा गंभीरच झाले होते. कारण निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतशी आपली वळकटी बांधायला फडणवीसशास्त्रींना भाग पाडले जाईल आणि मग नंबर आहे चंद्रकांतदादांचा. पण आपण आता हयातभर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आहोत, चंद्रकांतदादा थोडेसे मनातून नाराज झाले. शेजारीच बसलेल्या दानवेंना म्हणाले की, मराठा समाजाच्या महामोर्चांनी घाबरू नका, असे हा आम्हाला सांगतोय, मग लेका, ‘किती दिवस मुख्यमंत्री राहणार माहिती नाही’, ही भाषा कशाला सुरू केलीस? एकूणच ?भाजपाच्या राज्य कार्यकारिणीत मुख्यमंत्र्यांचा धमकीवजा इशारा कार्यकारिणी सदस्यांनी फारसा गांभीर्याने घेतला नाही. कारण तहहयात मुख्यमंत्रीपदावर बसल्याचा आव आणणा-या देवेंद्र फडणवीस नामक माणसाचा वकूब सगळय़ांनाच माहीत आहे आणि त्यांचा राजकीय पोच हाही कळून चुकलेला आहे. स्वत:च्या गावातील गुंडगिरी त्यांना आटोक्यात आणता येत नाही. ते महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला धमक्या द्यायला निघालेले आहेत. कुंडल्या उघडय़ा करीन म्हणतात..

आता या फडणवीसशास्त्रींना स्पष्टच सांगणे आहे की, तुम्हाला महाराष्ट्र कळायला फार वेळ लागेल. फार बच्चे आहात. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी अशी दमदाटीची आणि धमकीची भाषा केलेली नव्हती. जी तुमच्या तोंडून महाराष्ट्र ऐकतो आहे. सभ्यपणे बोललात तर महाराष्ट्र सभ्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला एक सुसंस्कृत असे वलय आहे. एक सभ्य परंपरा आहे. त्या त्या वेळचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मोठे करण्याकरिता सर्वाना बरोबर घेऊन जायची भाषा आजपर्यंत करत आलेत. तुमच्या तोंडून भलतेच काही निघत आहे. सत्ता हातात असल्यामुळे मी काही वाट्टेल ते करू?शकतो, कोणाच्याही कुंडल्या उघडू शकतो, अशा भ्रमात तुम्ही आहात. तुमच्या मंत्रिमंडळातील ज्या भ्रष्ट मंत्र्यांच्या कुंडल्यांची सीबीआय, सेबीने गंभीर दखल घेतली. तुमच्याच खात्याच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आज रेकॉर्डवर आहेत. ज्यांना तुम्ही क्लीनचिट दिलीत, ती क्लीनचिट देण्याचा तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्र पाहतो आहे. तेव्हा आधी तुमच्या मंत्रिमंडळाच्या पायाखाली काय जळते आहे ते बघा. ते निलंगेकर फक्त जामीन आहेत, अशी धादांत खोटी माहिती तुम्ही विधानसभेत दिली होती. त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. नाकारता का ते? काढता का त्यांची कुंडली बाहेर? काढता का सुभाष देशमुख यांची कुंडली? काढता का राजकुमार रावळची कुंडली? दोंडाईला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे की नाही? एक मंत्री नाही २० मंत्री आहेत. कोणाला धमक्या देता? महाराष्ट्र तुम्हाला आंदण मिळाला असे समजू नका. मोदी लाट आल्यानंतरही तुम्हाला बहुमत मिळवता आले नाही महाराज! आणि आता खडसे बाहेर गेल्यानंतर तुमची जीभ जास्त सैल झाली असली तरी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने बांगड्या भरलेल्या नाहीत. पळता भुई थोडी होईल. तेव्हा फार भ्रमात राहू नका आणि फार मिजाशीत कुंडल्या मांडू नका. आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील सभ्य परंपरांना आपण हरताळ फासत आहात. कृपा करून हिंमत असेल तर कुंडल्या जाहीर करा. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. तुमच्या भाजपाच्या कल्याणच्या नगरसेवकाला एक लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. कोणाच्या कुंडल्या मांडता? तुमच्या मागच्या युतीच्या सरकारात तुमच्याच काकू शोभाताई यांना राजीनामा का द्यावा लागला महाराज? मांडता त्यांची कुंडली? महादेव शिवणकरांची कुंडली मांडता? मांडा.. विरोधी पक्षाचीही मांडा आणि तुमच्या पक्षाचे ते माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण.. काढता त्यांची कुंडली..? फडणवीसशास्त्री, खूप शिकायचे आहे तुम्हाला अजून.. राजकारणात पोरसवदा आहात. सत्तेमुळे उतलेले आहात. तो तुमचा नक्शा महाराष्ट्रातील जनता उतरवेल. याची खूणगाठ बांधून ठेवा आणि काढा एकेकाच्या कुंडल्या बाहेर..

मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून फार ऊतू नका, मातू नका. राजकारणात कालचे आज राहात नाही. आजचे उद्या राहणार नाही. त्यामुळे १०० वर्षे मुख्यमंत्रीपदावर तुम्हीच राहणार, असे समजून कुंडली काढण्याची भाषा तुम्ही केलीत. विरोधकांसाठी अस्त्रे आणि शस्त्रे तुमच्याजवळ आहेत, शमीच्या झाडावर ढोलीमध्ये ठेवली आहेत का? पांडव समजता की काय स्वत:ला? आधी गृहमंत्रीपद नीट सांभाळा. कोपर्डीची घटना केवळ सामाजिक अपराध नाही. तुमच्या गृहखात्याची लाज निघालेली आहे. महाराष्ट्र बलात्कारात एक नंबरवर आहे. तो तुमच्या राजवटीत आहे. महाराष्ट्र अत्याचारात एक नंबरवर आहे. तो तुमच्या राजवटीत आहे. विनयभंगात महाराष्ट्र एक नंबरवर आहे. तोही तुमच्याच राजवटीत आहे. कुंडल्या दुष्टांच्या काढा. तुमच्या नागपुरात काय धिंगाणा चालू आहे. त्या गुंड कंपनीच्या कुंडल्या काढा. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला धमक्या देऊन हा विरोधी पक्ष तुम्हाला घाबरेल.. किती भाबडे आहात हो.. काय महाराष्ट्र माहिती आहे तुम्हाला? आकाशातून तुमच्या पायावर मुख्यमंत्रीपदाची थाळी पडली म्हणून स्वर्गाला हात टेकले असे समजू नका.. मुख्यमंत्रीपदाचे ‘घी’ पाहिलेत, जनतेचा बडगा तुम्हाला अजून पाहायचा आहे. एवढेच या निमित्ताने.. आणि काढा आता कुंडल्या बाहेर..!

[EPSB]

देवेंद्रशास्त्री, उघडा की कुंडल्या वाट कशाला बघता? »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. [/EPSB]

1 COMMENT

  1. देवेंद्र फडणवीस धमक्या देतात कारण दोन वर्षात त्यांनी{स्वतः } कोणताही भ्रस्टाचार केलेला नाही त्यामुळे ते बिनधास्त बोलतात या अगोदरचे मंत्री बोलत नव्हते कारण त्याच्या काळात एवढा भ्रस्टाचार झाला कि तेरीभी चूप मेरीभी चूप आणि हो फडवीसांनी कुंडली काढतो म्हटलं तर तुम्ही त्याची जात काढली मग शारदपवारांना म्हणा आता कायद्याचा दुरुपयोग कोण करत आहे तुम्ही ब्राम्हणाची जात काढायची आणि तुमची जात काढली कि मग कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या बोबा मारायच्या हा बारा न्याय एव्हढे वर्षे सत्तेत राहून तुम्ही मराठयांना तर काही दिले नाही आणि ब्राम्हणांनाही काही दिले नाही आमचा कोणत्याही जातीवर किंवा धर्मावर आक्षेप नाही पण तुम्ही मुख्यमंत्र्यां शात्री शात्री म्हणून जे संबोधले आहे यातच तुमची जातीयवादी मानसिकता लक्षात येते कारण मुख्यमंत्र्यांपेक्षा तुम्हाला त्याच्या जाती विषयी जास्त अडचण होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version