Home Uncategorized हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!

हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!

4

आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो.

सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी व प्रक्रिया करणे होय. यामुळे हळदीला चांगला भाव असूनही शेतकरी या पिकाची लागवड करण्यात धजावत नाहीत. परंतु सध्या हळद पिकामध्ये झालेल्या यांत्रिकीकरणामुळे हळदीखालील क्षेत्रात महाराष्ट्रात वाढ होत आहे.

हळदीची काढणी जातीपरत्वे केली जाते. हळदीमध्ये एकूण तीन प्रकारच्या जाती आढळतात. यामध्ये प्रामुख्याने हळव्या जातीला तयार होण्यास लागडीपासून ६ ते ७ महिने लागतात. निमगरव्या जातीस ७ ते ८ महिने लागतात तर गरव्या जातीस ८ ते ९ महिने लागतात.

व्यापारी दृष्टिकोनातून लागवडीस योग्य असलेल्या व अधिक उत्पादन मिळवून देणा-या जाती या गरव्या प्रकारात मोडतात. हळदीची फुले स्वरूपा, सेलम, कृ ष्णा,राजापुरी, डुग्गीराला, वायगाव, कडाप्पा इ. प्रमुख जातींचे लागवड केली जाते. या जाती तयार होण्यास जातिपरत्वे ८ ते ९ महिने लागतात.

हलक्या माळरानाच्या जमिनीपेक्षा चांगल्या पोताच्या कसदार जमिनीमध्ये या पिकाची पाने वरील कोलावधी पूर्ण झाला तरी ६० ते ७० टक्के इतकीच वाळवलेली असतात. मात्र याउलट माळरानच्या, हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९० टक्के पाने कालावधी पूर्ण होतेवेळी वाळलेली असतात, हे हळदीच्या बाबतीत काढणीपूर्वीच पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते.

पीक परिपक्वतेचे लक्षण दिसू लगताच १५ दिवस अगोदर पिकास पाणी देणे बंद करावे. पिकाचा कालावधी पूर्ण होताच पिकाचा पाला जमिनीलगत धारदार खुरप्याने कापून घ्यावा. ४ ते ५ दिवस शेतातच वाळू देऊन त्यानंतर गोळा करून घ्यावा. त्याचा उपयोग हळद शिजविण्यासाठी इंधन म्हणून चांगल्या प्रमाणात होऊ शकतो किंवा कंपोस्ट कल्चर वापरून उत्तम सेंद्रीय खत तयार करता येऊ शकते.

पाला कापणीनंतर ८ ते १० दिवसांनंतर थोडीशी जमिनी भेगावल्यानंतर कुदळीच्या सहाय्याने हळदीची काढणी करावी. इतर कोणत्याही लोखंडी हत्याराचा वापर केल्यास काढणीच्या वेळीच गड्डे चिरडल्याचे (फुटल्याचे) प्रमाण जास्त झाल्याचे प्रयोगाअंती दिसून आले आहे. काढणी करताना वरंब्यातील गड्डयाचे ३ ते ५ सें.मी. समोर कुदळ एकाच ठिकाणी एक ते दोन वेळा जोराने मारून जोराने दांडा उलट दिशेला दाबल्यास गड्डा सर्व हळकुंडासह उलटा होतो.

मात्र कुदळी वेगवेगळया ठिकाणी मारल्यास गड्डा फुटून हळकुंडे फुटण्याची जास्त शक्यता असते. हा निघालेला गड्डा सरीच्या वरंब्यावर उलटा २ ते ३ दिवस उन्हामध्ये वाळवावा. त्यामुळे त्यास चिकटलेली माती मोकळी होण्यास मदत होते. नंतर हा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगवेगळे होतात. त्यावेळी मात्र जेठे, गड्डे, बगल गड्डे, सोरा गड्डे, कुजकी सडलेली हळकुंडे अशा कच्च्या मालाची प्रतवारी करून वेगवेगळया ठिकाणी साठवणूक करावी.

हळद काढणीसाठी तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूर यांनी हळद काढणीसाठी ट्रक्टरचलित यंत्रे विकसित केली आहेत. हळद काढल्यानंतर त्यावर विविध प्रक्रिया करण्याचे गरजेचे असते. त्यामध्ये हळद कंद शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे आणि त्याला पिवळा धमक रंग आणणे, प्रतवारी करणे या प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हळदीला उत्तम भाव मिळतो.

हळद कंदाचे हेक्टरी उत्पादन २५० ते ३५० क्विंटल (ओली) इतके मिळते. त्याचे वाळून साधारणत: ५० ते ७० क्विंटल इतके उत्पादन मिळते. हळद काढणीनंतर शिजविण्यासाठी त्वरित सावलीत साठवण करावी व ४ ते ५ दिवसामध्येच हळदीवरती शिजविण्याची प्रक्रि या करावी. हळद प्रामुख्याने खाली नमूद केलेल्या पद्धतीने शिजवावे. अन्य कोणताही प्रकार हळद शिजविण्यासाठी आर्थिकदृष्टया फायद्याचा दिसून आलेला नाही.

हळद कायलीत शिजविणे

या पद्धतीने हळद शिजविताना साधारणपणे २०० ते १००० किलो क्षमतेच्या लोखंडी १६ गेज पत्र्यापासून बनविलेल्या कायलीमध्ये हळद शिजविली जाते. अशा पद्धतीच्या कायलीचा तळाचा व्यास ४ ते ५ फूट असतो. उंची २.५ ते ३ फूट असते. वरचा भाग तळाकडील भागापेक्षा अर्धा फुटाने रुंद असतो, त्यामुळे हळद बाहेर काढणे सोपे जाते. या पद्धतीमध्ये हळद शिजविताना कायलीमध्ये हळद भरल्यानंतर वरती २.५ ते ३ इंच पाणी राहील इतकीच हळद भरावी. त्यानंतर त्याच्यावरती हळदीचा पाला, गोणपाट जास्तीत जास्त वापरावा. जेणेकरून पाण्याची वाफ आता कोंडली जाईल याची दक्षता घ्यावी.

मात्र, चिखल मातीने वरून लिपने या प्रकाराचा अवलंब करू नये. साधारणपणे २.५ ते ३ तासामध्ये हळद शिजली जाते. हळद शिजल्यानंतर एक प्रकारचा वास आजूबाजूच्या वातावरणात पसरतो. त्याचप्रमाणे शिजलेली हळद अंगठा आणि तर्जनीमध्ये धरून दाबल्यास चिरडली जाते. शिजलेली हळद पाहण्याची दुसरी पद्धत म्हणजे काडयाच्या पेटीमधील काडी हळकुंडामध्ये घुसवल्यास काडी सहज आरपार जाते.

या पद्धतीमध्ये असणा-या त्रुटी म्हणजे शिजवलेली हळद कायलीमधून बाहेर काढताना हळकुंडे फुटली जातात. आतील हळद बाहेर काढण्यासाठी किमान निम्मे पाणी बाहेर सोडावे लागते. त्याचबरोबर कायलीच्या तळाशी बसलेला मातीचा थर संपूर्ण पाणी बाहेर काढल्याशिवाय काढता येत नाही, त्यामुळे श्रम वाढतात. काही प्रमाणात हळकुंडाचे नुकसान होते. त्यामुळे मालाची प्रतही खराब होते. या पद्धतीमध्येच थोडी सुधारणा केल्यानंतर पुढील दोन प्रकारामध्ये हळद शिजविल्यास उत्तम प्रकारची हळद मिळेल.

हळद शिजविण्याची सुधारित पद्धत

हळद शिजविण्याच्या पहिल्या पद्धतीमध्ये वापरात असलेल्या कायलीचा वापर या पद्धतीमध्ये केला जातो. फरक इतकाच की या पद्धतीमध्ये ३/४ पाण्याने भरलेल्या कायलीमध्ये ऑईलचे रिकामे अर्धे कापलेले बॅरेल हळदीने भरून ठेवले जातात. हे अर्धे कापलेले बॅरल तळाला एका बाजूला २ ते ३ इंच अंतरावरती भोके पाडून दोन्ही बाजूला ९ ते १२ इंच उंचीच्या लोखंडी कडया फिट कराव्या लागतात.

अशा पद्धतीमध्ये एका ड्रममध्ये ५५ ते ६० किलो ओली हळद बसते आणि एकावेळी २५० ते ३०० किलो हळद ३० ते ३५ मिनिटामध्ये शिजते. कायलीतील पाणी काढून टाकावे लागत नसल्याने उकळलेले पाणी वाया जात नाही. प्रत्येकवेळी ड्रम काढल्यानंतर ३ ते ४ बादल्या पाणी ड्रमची लेव्हल होईपर्यंतच घालावे लागते. या पद्धतीमुळे शिजलेल्या हळदीस पॉलिश जास्त वेळ करावे लागत नाही, त्यामुळे घट कमी येते. हळदीस चांगले पॉलिश होते. हळकुंडास चकाकी येते, त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो.

हळद शिजविण्याचे सयंत्र

वरील पद्धतीमध्ये तयार होणा-या हळदीची प्रत, त्यासाठी लागणारे इंधन, मजूर तसेच वेळ यामुळे शेतकरी हळद पीक लागवडीकडे पैसे देणारे पीक असूनही मोठया प्रमाणावर वळत नाहीत. त्यामुळे ही पद्धत विकसित केलेली आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये हळद वाफेवर शिजविली जाते. त्यामुळे हळदीची प्रत चांगली मिळतेच त्याचबरोबर इंधन, वेळ, मजुर इ.ची सुद्धा बचत होते.

या पद्धतीमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सांगाडयावर २००० ते ३००० लिटर क्षमतेची पत्र्याची पाण्याची टाकी बसविलेली असते. या टाकीच्या खालच्या बाजूला लोखंडी पाईपच्या सहाय्याने उष्णता देण्यास जागा वाढवलेली असते. या पाण्याच्या टाकीला दोन व्हॉल्व्ह ठेवले असून खालच्या व्हॉल्व्हपर्यंत कमीत कमी पाणी असावे तर वरच्या व्हॉल्व्हपर्यंत जास्तीत जास्त पाणी भरावे.

वरील ४ ते ५ इंच जागेमध्ये पाण्याची वाफ गोळा होते. ही तयार झालेली वाफ पाईपच्या सहाय्याने ड्रममध्ये सोडली जाते. यामध्ये शेतक-यांच्या भांडवलावर आधारित चार ड्रॅम, दोन ड्रमचे किंवा न हलवता येणारे दोन ड्रमचे सयंत्र तयार करता येते.

दोन ड्रममधील सयंत्रामध्ये सुरुवातीला पाणी उकळण्यास ६० ते ९० मिनिटे लागतात. एकदा पाणी उकळल्यानंतर तयार झालेली पाण्याची वाफ ड्रममध्ये सोडली जाते. एका ड्रममध्ये साधारणत: ३०० ते ३५० किली ओली हळद बसते. सुरुवातीला हळदीचे थंड तापमान तर वाफेचे उष्ण तापमान यामुळेच वाफेचे पाण्यात रूपांतर होऊन ड्रमच्या खालील बाजूने हळद काढण्यासाठी ठेवलेल्या खिडकीतून पाणी पडण्यास सुरुवात होते. संपूर्ण ड्रममध्ये हळद शिजल्यानंतर या पाण्याऐवजी खालून वाफ येण्यास सुरुवात होते.

ड्रमच्या खालच्या दरवाजातून वाफ येऊ लागताच हळद शिजली हे समजावे. तोपर्यंत कच्च्या हळदीने दुसरा ड्रॅम भरून घ्यावा. त्यामध्ये प्रथमत: व्हॉल्व्हच्या सहाय्याने वाफ सोडून मगच दुस-या ड्रमचा दरवाजा उघडून त्यातील हळद छोटया ट्रॉलीमध्ये पाडावी व ही हळद वाळण्यास टाकावी. हळद शिजविण्यासाठी बाभूळ, निलगिरी किंवा इतर जळाऊ लाकू ड वापरावे.

एक टन जळणामध्ये ५५ ते ६० ड्रम शिजवले जातात. एक ड्रम शिजविण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. पाण्याची पातळी कमी झाल्यास एच.टी.पी.पंपाद्वारे व्हॉल्व्हमधून पाणी भरता येते. त्यामुळे मशीन बंद करण्याची गरज नसते. ही हळद संपूर्णत: वाफेवर शिजत असल्यामुळे कु रकुमीनचे प्रमाण हळदीत आहे तसे साठविले जाते, त्यामुळे हळदीस चांगला रंग प्राप्त होऊन दरही चांगला मिळतो.

»  एका बॅचमध्ये साधारणपणे ३०० किलो कंद आणि दररोज ८ तासांत ९० क्विंटल हळद कंद उकळता येतात.

»  हळद कंदाची ३०० किलोची एक बॅच उकळण्यासाठी सुमारे २५ ते ३० किलो सरपण (हळदीची पाने) इतकीच आवश्यकता असते.

»  फक्त तीनच माणसे एका दिवसात ९० क्विंटल हळद शिजवू शकतात.

»  या कामासाठी कुशल कामगारांची आवश्यकता नसते. घरातील माणसे हे काम करू शकतात.

»  शेतक-यांच्या गरजेनुसार या युनिटची साईज वाढवता येते.

»  २०० ते २५० किलो क्षमतेचे एक युनिट तयार करण्याचा खर्च रुपये २,५०,०००/- इतका येतो.

»  केवळ वाफेवर कंद शिजविल्यामुळे कंद कमी प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि लवकर वाळतात. पारंपरिक पद्धतीत कंद वाळण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. परंतु या पद्धतीत कंद ८ ते १० दिवसात वाळतात.

»  या सलग शिजविण्याच्या पद्धतीमुळे वेळ आणि इंधनाची बचत होते.

हळद वाळविणे व पॉलिश करणे

शिजवलेली हळद ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळवावी, हळद वाळत घालताना पहिले चार दिवस दोन इंचापेक्षा जाड थर देऊ नये. ओली हळद सायंकाळी एकत्र गोळा करू नये. हळद वाळत घालताना कठीण जागेवरती किंवा ताडपत्रीवरती घालावी. काळया मातीत जमिनी सपाट करून पसरू नये. त्यामुळे अनावश्यक मजुरी खर्च वाढतो. शिवाय मालाची प्रत खराब होते. हळद वाळत घातल्यानंतर आवश्यकतेनुसार एक-दोन वेळा हालवून घ्यावी. माती, काडी, कचरा वेळोवेळी बाहेर काढून टाकावा. शिजवलेली हळद चार दिवस उन्हात वाळविल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत जाण्याने/ पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.

पूर्ण वाळलेली हळद व अर्धवट वाळलेली हळद एकत्र मिसळून देऊ नये. अधून-मधून हात देताना कमी शिजलेली जादा फुगीर दिसत असलेली हळकुंडे त्वरित वेचून बाजूला काढावीत. अशा हळकुंडांना किमाच चार उन्हे जास्त द्यावी लागतात.

हळद शिजविताना कायलीतील पाण्यातील मातीचा थर हळदीवर बसलेला असतो. त्याचप्रमाणे हळदीची साल जातिपरत्वे कमी-जास्त जाडीची असते. ही साल हळद शिजवल्यानंतर काळपट दिसते व चिरते. ती पॉलिश करून काढल्याशिवाय हळद आकर्षक दिसत नाही. तिला बाजारभाव चांगला मिळत नाही.

म्हणून हळद पॉलिश करणे गरजेचे असते. हळद पॉलिश करण्यासाठी लोखंडी ऑईलचा बॅरल वापरावा. हे बॅरल एका स्टॅण्डवर ठेवावे. हळद भरण्यासाठी बॅरलला ६ ते ९ इंचांचे तोंड ठेवावे. या बॅरलवर १० ते १५ से.मी.अंतरावर ३ ते ६ से.मी.लांबीची व १ ते १.५ से.मी.रुंदीची भोके छन्नीने पाडून घ्यावीत. भोके पाडलेली आतील भाग खरबरीत होतो.

पिंपाच्या मधून एक लोखंडी दांडा बसवून त्याला पिंपाच्या बाहेर गेल्यानंतर दोन्ही बाजूला हॅण्डलसारखा आकार दिल्यावर दोन व्यक्तींना ड्रम स्टॅण्डवर ठेवल्यावर गोलाकार फिरवता येतो. अशा पिंपात पॉलिश करावयाची हळद टाकून त्यामध्ये घर्षणासाठी अणुकु चीदार ५ ते ७ दगड टाकून ड्रम फिरविल्यास आतील हळद लवकर पॉलिश होते. या पद्धतीने दोन गडी एका तासात २५ ते ३० किलो हळद पॉलिश करतात. त्याच तत्त्वाचा वापर करून इलेक्ट्रिक मोटारीवर चालणारे किंवा ट्रॅक्टरवर चालणारे २ ते १० क्विंटल क्षमतेपर्यंतची हळद पॉलिश ड्रम बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वाळलेल्या हळदीचे उत्पादन ओल्या हळदीच्या २० ते २५ टक्के इतके मिळते.

हळदीची प्रतवारी करणे

हळद पॉलिश केल्यानंतर हळकुंडाची किमान चार प्रकारामध्ये प्रतवारी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये –

»  जाड, लांब हळकुंडे (३ से.मी. पेक्षा लांब)

»  मध्यम जाड हळकुंडे (२ ते ३ से.मी.लांब)

»  लहान आकाराची हळकुं डे (२ से.मी.पेक्षा कमी लांबीची)

माती खडेविरहित लहान कणी

अशा वेगवेगळया प्रकारात हळदीची प्रतवारी करून चांगल्या बारदान्यामध्ये पॅकिंग करावे. यामध्ये सारे गड्डे व शिजवलेले गड्डे हे वेगवेगळया ठिकाणी पॅकिंग करावेत. हळदीची विक्री ही उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने प्रत्यक्षात मालाचा दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी पाहिल्या जातात. त्यामध्ये प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हळद प्रक्रियायुक्त पदार्थ

हळद पावडर

हळद पावडर तयार करण्यासाठी वेगवेगळया जातीच्या हळदीचा वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठया हळकुंडाचा इलेक्ट्रिक मोटारीवर चालणा-या चक्की वजा मशीनमध्ये भरडा केला जातो. मशीनमध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते. ही हळद पावडर वेगवेगळया मेशच्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळीमधून बाहेर पडते. तयार पावडर ५,१०,२५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविली जाते.

कु रकुमीन

वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा कोढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातिपरत्वे २ ते ६ टक्के इतके असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदर्य प्रसाधने बनविता येतात. वाणपरत्वे हळदीमध्ये कुरकु मीनचे प्रमाण बदलते.

कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन २००४ साली प्रसारित केलेल्या फुले स्वरूपा (डी.टी.एस २२२) या जातीमध्ये सर्वाधिक कुरकुमीनचे प्रमाण ५.२ टक्के इतके आढळून आले आहे. वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीनमुळे अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. कुरकुमीनसाठी (४.५ टक्के) सेलम ही जातदेखील उत्तम आहे.

कुंकू

हळदीचे गड्डे मुख्यत: कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढ-या चिकनमातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक अ‍ॅसिड व बोरिक अ‍ॅसिडची प्रक्रि या करतात. हे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे ठिकठिकाणी देवालयाच्या परिसरात आहेत.

रंगनिर्मिती

लोकरी, रेशमी, सुती कपडयाला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग क रतात. सध्या काही प्रमाणात सुती कपडय़ांना हळदीचा रंग देतात. औषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीच्या रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होता.

सौंदर्य प्रसाधने

सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक वनस्पती लागवड उपयुक्त ठरते. त्यामध्ये हळदीचा सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळया सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो. स्नानापूर्वी चेह-याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेह-याचे सौंदर्य वाढते.

सुगंधी तेल

हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुंगधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्डयापासून ५ ते ६ टक्के तेल मिसळते. हे तेल नारंगी पिवळया रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.

ओलीओरिझीन निर्मिती

हळदीच्या भुकटीपासून ओलीओरिझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थामध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७ टक्के असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे.

औषधे तयार करणे

आयुर्वेदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रुक्ष, ब्रव्य, कृमीहर,असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग क रतात. हळद ही पाचक, कृ मिनाशक, शक्तिवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे. मूत्रांशाच्या तक्रारीवर व मूतखडयासाठी हळदीचा उपयोग होतो. हळदीचे तेल अँटीसेप्टिक आहे. हळदीचे असे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

ओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते. अशाप्रकारे ओल्या हळदीपासून विविध पदार्थ तयार करता येतात.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version