Home टॉप स्टोरी बाप्पाला भावपूर्ण निरोप

बाप्पाला भावपूर्ण निरोप

1

ढोल-ताशाच्या दणदणाटात गुलाल व फुलांची उधळण करीत मुंबईसह राज्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात विसर्जन झाले.

मुंबई- ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, ढोल-ताशाच्या दणदणाटात, बँड पथकांच्या तालावर, गुलाल व फुलांची प्रचंड उधळण करीत मुंबईसह राज्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात विसर्जन होत आहे. विसर्जनासाठी अलोट गर्दी उसळली होती.

मुंबईचा राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघाली होती.मिरवणुकीत बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरोघरी मोठय़ा भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे विधीवत विसर्जन रविवार करण्यात आले. गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणतं मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. २९,९७० घरगुती गणपती व ९,६९१ सार्वजनिक गणेशमुर्तीचे विसर्जन यावेळी करण्यात आले. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मुंबईतील विविध चौपाटय़ांवर विशेष खबरदारी घेण्यात आली होती.

१७ सप्टेंबरला गणपतीची स्थापन झाल्यानंतर सर्वत्र बाप्पांचा गजर घुमत होता. दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पाला दररोज मोदक, पेढय़ांचा नैवेद्य दाखवून भक्तांनी मनोभावे त्याची पुजा केली. या काळात गणरायाच्या सहवासात राहून दहा दिवस कधी सरले भक्तांना कळलेच नाही. पण, निरोप देण्यापूर्वी अनेकांनी आपल्या मनातील भावना बाप्पांसमोर व्यक्त केल्या. जुहू, दादर, वर्सोवा आणि गिरगाव चौपाटी, शिवाजीपार्क, शीतल तलाव (कुर्ला), पवई तलाव येथे गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. बाप्पाला निरोप देताना दुपारी १२ वाजल्यापासून विसर्जनस्थळी गणरायाच्या सामुहिक आरत्यांचे स्वर ऐकू येत होते. दुपारनंतर मोठय़ाप्रमाणात घरगुती व सार्वजनिक गणेशमुर्ती विसर्जनासाठी चौपाटींच्या दिशेने येऊ लागल्या होत्या. त्यामुळे विविध चौपाटय़ांवर आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनाकरिता भाविकांनी गर्दी पाहायला मिळाली. काही मिनिटांच्या अंतरावर घरगुती गणपती विसर्जनासाठी येत असल्याने अत्यंत व्यवस्थितपणे विसर्जन मिरवणुक पार पडली. ‘‘गणपती गेले गावाला..चैन पडेना आम्हाला’’ अशी भावना व्यक्त करत विविध चौपाटय़ांवरील वातावरण अक्षरश: भक्तीमय झाले होते.

बाप्पाला निरोप देताना लहान मुलांसह कुटुंबातील सदस्याही भावूक झाले होते. गणपती विसर्जनाचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. विविध ठिकाणी पोलिसांची पथक बारकाईने परिसराचा पहारा देत होते. गाडय़ांमधून येणा-या गणपतींसाठी विशिष्ट मार्ग तयार करून देण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता विविध चौपाटीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्यात स्पीड बोट, लाईफ गार्डची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय ज्या ठिकाणी बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी तलाव किंवा समुद्राची सोय नाही. अशा ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. या कृत्रिम तलावात २,४१० घरगुती गणपती व १७५ सार्वजनिक गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले.

सबकुछ बाप्पांसाठी ..

गणेशोत्सवात विसर्जनाच्या काळात मूर्तीचे विसर्जन करणा-यांची मिनतवारी करावी लागते. मात्र, गायमुख खाडी येथील विसर्जनादरम्यान शांताई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लगबगीने पुढे सरसावतात. या मदतीसाठी त्यांना पैशाची फारशी अपेक्षा नसते. गेल्या अनेक वर्षापासून हे प्रतिष्ठान हे काम खास गणपतीबाप्पांसाठी करीत आहे.

गायमुख परिसरात राहणारे पंडित भोईर गेल्या सहा वर्षापासून हे काम करीत आहेत. त्यासाठी ते कार्यकर्त्यांना लाईफ जॅकेटही पुरवले जाते.

या प्रतिष्ठानने या गणपती उत्सवाच्या काळात तब्बल चौदाशे गणेशमूर्तीचे विसर्जन केले आहे. अनेक मंडळे गणपती विसर्जन करताना भक्तांकडून पैशाची अपेक्षा करीत असतात. मात्र,या मंडळाचे कार्यकर्ते कामासाठी कोणाकडे पैशाची अपेक्षा करीत नाहीत. आमचे काम केवळ विसर्जनाचे आहे. त्यासाठी पैसे मिळावे म्हणून कोणालाही अडवून ठेवत नाही, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित भोईर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि मुंबईच्या महापौर बंगल्यातील गणरायाचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. मुंबईत विसर्जनासाठी महापालिकेतर्फे २६ कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते. मुंबईतील महापौर बंगल्याच्या परिसरातही एक विसर्जन तलाव बनवला आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आई, मुलगी आणि पत्नीसह आरती करुन गणरायाचे विसर्जन केले.

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीलाही सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यातही मोठी गर्दी उसळली होती.

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि महापौर दत्ता धनकवडे यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीला सुरुवात केली.

पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

मानाचे पहिले तीन गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या कसबा, तांबडी जोगेश्‍वरी आणि गुरुजी तालीम या मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन डेक्कनजवळील नटेश्‍वर घाट याठिकाणी तयार करण्यात आलेल्या हौदात झाले.

पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

तर तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा या मानाच्या उर्वरीत दोन गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडई मंडळाच्या मूर्ती खंडुजीबाबा चौकाजवळ पांचाळेश्‍वर घाटावर विसर्जित झाल्या.

कोल्हापूर येथील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. संपूर्ण कोल्हापूरात मिरवणुकीचा जल्लोष दिसून आला.

कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपती बाप्पाची शाही मिरवणूक सकाळी नऊच्या सुमारास सुरुवात झाली. राज्याचे सहकारमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या मिरवणुकीला सुरुवात झाली.

राज्यात विसर्जन सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस सज्ज होते.

मुंबईत गिरगाव, दादर चौपाटी, माहीम, जुहू, वर्सोवा, मार्वे, गोराईसह शीव तलाव, पवई तलाव आदी ७२ विसर्जन स्थळांवर बाप्पांना निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली होती.

गिरगाव, दादर, जुहू, मालाड आदी लहान-मोठ्या चौपाट्यांवर पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जन मिरवणुकींवर पोलिसांची गस्ती पथके, संरक्षण दलाचे हेलिकॉप्टर आणि सीसीटीव्ही,  ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होते.

यात गृहरक्षक दल, एनएसएस- एनसीसी कॅडेटची मदतही घेतली. बंदोबस्तासाठी जवळपास ४० हजार पोलीस तैनात होते. घातपाताची शक्यता लक्षात घेऊन रस्ते आणि चौपाटीवर भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले होते.

तसेच मुंबई महानगर पालिकेमार्फत प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव केले होते. विसर्जन मिरवणुकीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चौपाटीकडे जाणा-या ४९ प्रमुख रस्त्यांच्या मार्गात बदल केले होते.

कल्याण-डोंबिवली शहरात ३२ विसर्जन घाट होते. त्यातील २६ घाटांवर महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडी, कुंभारखान पाडा, जुनी डोंबिवली गणेश घाट, पंचायत बावडी, आयरे खदान, चोळेगाव, लोढा हेवन कोळेगाव खदान, आजदेगाव तलाव, कल्याण पश्चिमेत गौरीपाडा, उंबर्डे, सापर्डे, गांधारी नदी, वासुंद्री नदी, कल्याण खाडी, काळू नदी, अटाळी, मोहने, यादवनगर, टिटवाळा नदी, चिंचपाडा, तिसाई आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात गणेशमूर्तींचे विर्सजन करण्यात आले.

उल्हासनगरमधील गणेशघाट, सेंच्युरी क्लबसमोरील मोहने धरणावरील विसर्जन घाट, बदलापूरमधील गावदेवी तलाव, पांजरपोळ, कांबा गावातील पाचवा मैल, कल्याण खाडी विसर्जन घाट आदी ठिकाणीही गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

कोकणासह राज्यात सर्वत्र दुपारनंतर घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गेले दहा दिवस चैतन्याची लाट घेऊन आलेल्या बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या.!’ असे म्हणत भाविकांनी जड अंतकरणाने निरोप दिला.

सीसीटीव्ही, ड्रोनची नजर

मुंबई पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी मोठय़ा चौपाटय़ांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, ड्रोनच्या माध्यमातून मिरवणुकीवर हालचालींवर लक्ष ठेवले गेले.

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर

अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारनंतर कधीही गणपतीचे विसर्जन करावे. पुढच्या वर्षी ५ सप्टेंबरला म्हणजे १२ दिवस आधी गणपतीचे आगमन होणार आहे. – दा. कृ. सोमण, ज्येष्ठ पंचांगकर्ते

[EPSB]

आज महानिरोप »

गेले दहा दिवस भक्तांचा  पाहुणचार घेतल्यानंतर गणपती बाप्पा रविवारी अनंत चतुर्दशीला आपल्या गावाला जाणार आहेत.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version