Home क्रीडा आशियाई स्पर्धेत भारताचा पदकांचा षटकार

आशियाई स्पर्धेत भारताचा पदकांचा षटकार

0

महिला कबड्डी संघाला रौप्यपदक; सहाव्या दिवशी दोन सुवर्णासह सहा पदके, नौकानयन (रोइंग) प्रकारामध्ये तीन पदके

जकार्ता – भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहावा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. शुक्रवारी भारताच्या रोईंगपटूंसह (नौकानयन) पुरुष टेनिसपटूंनी सुवर्ण कामगिरी केली. महिला कबड्डीतील रौप्यपदक, रोईंगमधील दोन कांस्य आणि नेमबाजीतील (हिना सिद्धू) कांस्यपदकाच्या जोरावर सहा पदके मिळाली. एका दिवसात दोन सुवर्ण तसेच सहा पदके मिळवण्याची यंदाच्या स्पर्धेतील भारताची ही पहिलीच वेळ आहे.

भारताच्या नौकानयनपटूंनी तीन पदके मिळवत सहाव्या दिवसाची धडाकेबाज सुरुवात केली. सांघिक क्वाड्रपल स्कल्स प्रकारात स्वर्ण सिंग, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश आणि सुखतीम सिंह यांनी बाजी मारली. त्यांनी ६ मिनिटे १७.१३ सेंकद अशा वेळेमध्ये प्रस्तावित अंतर पार करताना सुवर्णपदक पटकावले. वैयक्तिक प्रकारामध्ये दत्तू भोकनळ पदक मिळवण्यात अपयशी ठरला. स्वर्ण सिंग आणि ओम प्रकाश यांनाही दुहेरीत पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र, दत्तू आणि स्वर्ण सिंग याने सांघिक प्रकारात खेळ उंचावत गुरुवारचे अपयश भरून काढले.

रोहित कुमार आणि भगवान सिंग यांनी डबल्स स्कल्समध्ये तर, दुष्यंतने लाइटवेट सिंगल स्कल्समध्ये कांस्य पदक पटकावले. रोहित आणि भगवानने ७ मिनिटे ४.६१ सेकंदाची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. जपानच्या मियाउरा मायायुकी आणि ताएका मासाहिरो या जोडीने सुवर्ण तसेच कोरियाच्या किम बी आणि ली मिन हुक यांनी रौप्यपदक मिळवले. कालच्या दिवसातील पहिले पदक दुष्यंतने लाइटवेट सिंगल प्रकारामध्ये मिळवून दिले. दुष्यंतने कांस्यपदक जिंकले. ‘रेस’मधील शेवटच्या ५०० मीटरमध्ये दुष्यंतला प्रचंड थकवा आला होता. ‘रेस’ संपल्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून नेण्यात आले होते. पदकवितरण सोहळय़ामध्ये दुष्यंतला उभे राहण्यास अवघड जात होते.

नेमबाजीत हिना सिद्धू हिला कांस्य
भारताची अनुभवी नेमबाज हिना सिद्धू हिला महिला गटात १० मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारामध्ये कांस्यपदक मिळाले. पिछाडी भरून काढताना तिने २१९.२ गुणांची कमाई करताना तिसरे स्थान मिळवले. स्पर्धा विक्रमासह चीनच्या वँग कियान (२४०.३ गुण) हिने सुवर्ण कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या किम मिनजुंग हिला (२३७.६ गुण) रौप्यपदक मिळाले. हिना हिचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हे पाचवे पदक आहे. २०१८ गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण तसेच १० मीटर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवले आहे. नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये सिद्धू हिने दोनदा बाजी मारली आहे. या शिवाय जागतिक क्रमवारीमध्ये तिने अव्वल स्थानही पटकावले आहे.

सिद्धू हिला पदकप्राप्ती झाली तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती, १६ वर्षीय मनू भाकेर हिने पुन्हा एका निराशा केली. १० मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारामध्ये १७६.२ गुणांसह ती पाचव्या स्थानी राहिली.

महिला कबड्डी संघाला इराणने रोखले
जकार्ता – दोन वेळच्या सुवर्णपदक विजेत्या भारताच्या महिला कबड्डी संघाला सलग तिस-या सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले. अंतिम फेरीत भारताला इराणकडून २४-२७ असा पराभवाचा धक्का बसला.

रंगतदार लढतीमध्ये इराणने दुस-या सत्रामध्ये चमकदार खेळ केला. ११-१३ अशा पिछाडीवर त्यांनी सलग सहा गुण मिळवत १७-१३ अशी आघाडी घेतली आणि राखली. भारताच्या चढाईपटूंनी निराशा केली.

तिस-या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या भारताला पायल आणि सोनाली यांनी प्रभावी चढाया करत सुरुवातीला ७-३ अशी आघाडी मिळवून दिली. रणदीप हिची साथ मिळाल्याने आघाडी १३-८ अशी वाढली. त्याच्या बळावर भारताने मध्यंतराला १३-११ अशी निसटती आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताची सामन्यावरील पकड सैल झाली. त्याचा फायदा इराणने उठवला.

बोपण्णा-दिविजची बाजी
टेनिस क्रीडा प्रकारातील पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपन्ना याने दिविज शरणसह सुवर्णपदकाची कमाई केली. अव्वल मानांकित बोपन्ना-शरण जोडीने अंतिम फेरीत कझाकस्तानच्या अलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येवसेव जोडीचा ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये अवघ्या ५२ मिनिटांमध्ये पराभव केला. आशियाई स्पर्धेत भारताने पुरुष दुहेरीमध्ये सुवर्ण कामगिरी करण्याची ही चौथी वेळ आहे. २०१०मध्ये सोमदेव देववर्मन आणि सनम सिंग जोडीने बाजी मारली होती. २००२ आणि २००६मध्ये महेश भूपती आणि लिअँडर पेस जोडीने अजिंक्य राहताना सलग दोन सुवर्णपदके पटकावली होती. बोपण्णा-दिविज जोडीच्या रूपाने आशियाई स्पर्धेतील भारताचे हे एकूण पाचवे पदक आहे. साकेत मिनेनी आणि सनम सिंग यांना २०१४मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version