Poems : काव्यरंग

जंगलातील थंडी


भल्या पहाटे
जंगलात पडली थंडी
सर्व पशुपक्ष्यांची
उडाली घाबरगुंडी

सर्वत्र पसरले
पांढरे दाट धुके
गारठलेला कुत्रा
जोरजोराने भुके

चिमणीची पिल्लं
खोप्यात बसली दडून
हरणाच्या अंगावरील शाल
कोल्ह्याने घेतली ओढून

हत्तीने घातला
उलनचा जाड कोट
बटण गेले तुटून
उघडे राहीले पोट

कुडकुडणाच्या माकडाने
घातली कानटोपी
जाडे भरडे पोते पांघरून
गाढव गेला झोपी

थंडीने केली
सर्वांची अशी दैना
उन्हाची वाट पाहे
राघू आणि मैना

खोकडून खोकलून
सिंह वैतागला जाम
गारठणाऱ्या थंडीत
सर्वांना फुटला घाम

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ


चेहरे...


माणसांचे चेहरे, इथे
‘मुखवट्यात’ जगताहेत,
स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे
प्रश्नांकित बघताहेत! ...१

सरड्यासारखे घडी-घडिला
रंग नवे बदलताहेत,
सावली हरवून, स्वतःचे
अस्तित्व मात्र जपताहेत! ...२

कर्तृत्वाची कोरी पाटी
कोळशाने गिरवताहेत,
चारित्र्याला काळे फासून
सफेदित मिरवताहेत! ...३

विवेकाला टोपी घालून
जुनी कात टाकताहेत,
व्यभिचाराचं पोट फुगवून
उघडं पितळ झाकताहेत! ...४

कावळ्यासारखे खरकट्यावर
ताव मारीत ढेकरताहेत,
बेडकाच्या औलादीचे
बैलाएवढे फुगताहेत! ...५

हरिनामाचा टिळा लावून
टाळ-मृदंग कुटताहेत,
अभंगाचे शील-सत्व
लावणीसंगे लुटताहेत! ...६

लाज-शरम चुलीत घालून
लिंगपिसाट पेटताहेत,
वासनेचे कुल्ले थोपटीत
आपलं घोडं रेटताहेत! ...७

‘थुकी’ लावून कर्तव्याला
पोळी आपली शेकताहेत,
हात बांधून ढुंगणावरती
इमान आपले विकताहेत! ...८

बुडाखालच्या अंधारात
दिशाहीन भटकताहेत,
आणि अखेर ‘तोंड घेऊन’ एकदाचे
भिंतीवर जाऊन लटकताहेत! ...९
- पांडुपुत्र, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे


नावडतीचं मीठ अळणी...


भेंडीची भाजी चिकट चिकट
मिरच्या खायला खूपच तिखट

कारल्याची भाजी कडूच कडू
कांद्याला पाहताच येतंय रडू

हिरवा चुका लागतोय आंबट
शेपू मेथीचं दाताला संकट

गाजर मुळे आणि बटाटा बीट
चवीला कुठे लागतात नीट

लेकरं धरतात पक्कीच गुळणी
नावडतीचं मीठच अळणी

सर्वच भाज्यांना ठेवतात नाव
केवळ मागतात बटर पावं
- भानुदास धोत्रे, परभणी

देव माझा शोधताना


राऊळाच्या पायरीचा देह तो उरणार आहे
मोहमाया लोभसारा कोणता सरणार आहे..

त्या तुक्याच्या सोबतीने देव माझा शोधताना
माणसाचा चेहराही आतला छळणार आहे..

या युगाचा हुंदका पण ओळखीच्या आसवांचा
काळजाचा घाव सारा शेवटी झरणार आहे

वेदनांचा गाव माझा आत माझ्या जागताना
ऐनवेळी जाणिवांचा पार तो रडणार आहे

मोक्ष देण्या पावलांना सावळ्या ये मायदारी
उंब-याचा कोंडमारा काय तो कळणार आहे...

- डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे
Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व