‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात
December 25, 2025 10:19 PM
नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुश चौधरी यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हातात ही कथा पुन्हा एकदा साकारली जात असल्यामुळे, या वेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार, यांचा अंदाज येतोय. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत.