Friday, October 16, 2026

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना

वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या हाडांचा सापळा आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही टाकी वापरात नव्हती. अनेक वर्षांपासून मृतदेह टाकीत असल्याने मृतदेहांच्या हाडांचा सापळा झाला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे हाडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. माणिकपूर पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

वसई पश्चिमेच्या माणिकपूर गावातील फडबाव शेजोळ येथे बारकुल्या नावाची दुमजली चाळ आहे. गावातील आल्मेडा नामक महिलेच्या मालकीची ही चाळ आहे. या चाळीत एकूण १० खोल्या आहेत. वसई स्थानकात व्यवसाय करणारे फेरीवाले या चाळीत राहतात. दरम्यान, या दुमजली चाळीच्यावर गच्ची (टॅरेस) आहे. टॅरेसवर जुनी पाण्याची टाकी आहे. मात्र ती कधी वापरात नव्हती. त्यामुळे पाण्याची टाकी तोडण्याचा निर्णय चाळ मालकाने घेतला. २९ जानेवारीपासून ब्रेकर मशीनच्या सहाय्याने टाकी पाडण्याचे काम सुरू होते.

३१ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास टाकीच्या उत्तर बाजूची भिंत अर्धवट तोडण्यात आली. त्यावेळी कामगारांना मानवी हाडांचे तुकडे आणि कवटी आढळळी. त्वरीत माणिकपूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. संपूर्ण टाकीची पाहणी केली असता कवटी, हाडांचे अनेक तुकडे, शर्ट, पॅण्ट आढळून आले. हाडांचा सापळा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठविण्यात आला आहे. प्रथमदर्शनी पुरुषाच्या हाडांचा सापळा आहे. हे स्पष्ट झाले आहे.

मानवी सापळा अनेक वर्ष जुना : सुरेश आल्मेडा (४६) हे चाळीची देखभाल दुरुस्ती करतात. ही चाळ ३० वर्षे जुनी असून माझ्या मावशीची आहे. पाण्याची टाकी बांधली होती मात्र ती वापरात नव्हती. पालिकेच्या नळाचे पाणी भाडेकरू वापरत होते असे ते म्हणाले. टॅरेसवर कुणी जात नव्हते. दोन वर्षांपासून टॅरेसचे गेट बंद होते. टाकीत हा मृतदेह असला तरी कधीही कसल्याही प्रकारची दुर्गंधी कुणाला आली नव्हती असेही आल्मेडा यांनी सांगितले. सध्या माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणाची कलम १९४ अन्वये अपमृत्यूची नोंद केली आहे. या चाळीत फेरीवाले राहतात. हा मृतदेह देखील ३५ ते ४० वर्षांच्या फेरीवाल्याचा असल्याची शक्यता आहे. आम्ही मागील ५ वर्षांतील बेपत्ता इसमांची माहिती तपासत आहोत असे या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हरिष पाटील यांनी सांगितले. या मानवी हाडांजवळ आढळलेल्या एका शर्टावर टेलरचे लेबल आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >