
ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि अत्याधुनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेजुरी बसस्थानकाच्या धर्तीवर राज्यातील निवडक बसस्थानकांवर दुमजली प्रसाधनगृहे उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या उपक्रमासाठी तब्बल १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे
नवीन दुमजली प्रसाधनगृहांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करून बसस्थानकावर मुक्काम करणाऱ्या प्रवाशांचीही विशेष काळजी घेतली जाणार आहे. सकाळी पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांना अंघोळ करता यावी, यासाठी स्वतंत्र स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था
या उपक्रमातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता आणि देखभाल. यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोयही त्याच ठिकाणी केली जाणार आहे. कर्मचारी उपलब्ध असल्यामुळे प्रसाधनगृहांची स्वच्छता नियमितपणे राखणे आणि देखभाल करणे अधिक सोपे होणार आहे. परिणामी प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा मिळण्यास मदत होईल.
Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत त्याला मोठा ...
१०० कोटींचा खर्च; पीपीपी तत्त्वाबाहेरील बसस्थानकांवर कामे
या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित न होणाऱ्या बसस्थानकांवर ही कामे एसटी महामंडळ स्वतःच्या खर्चातून करणार आहे. जेजुरी बसस्थानकावर उभारण्यात आलेल्या दुमजली प्रसाधनगृहांच्या धर्तीवर राज्यातील इतर निवडक बसस्थानकांवरही प्रवाशांच्या गरजेनुसार या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
एसटी बसस्थानकांचा बदलणार चेहरामोहरा!
एसटीचा प्रवास केवळ सुरक्षित आणि आरामदायी न राहता स्वच्छ व आरोग्यदायी व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नव्या सुविधांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, रात्री प्रवास करणारे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. १०० कोटींच्या या उपक्रमामुळे राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





