विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
March 16, 2026 01:36 PM
कोलकाता : पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केली. निवडणुकीचा हा कार्यक्रम जाहीर होऊन २४ तास उलटण्याआधीच पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती गृह सचिव जगदीश मीणा, डीजीपी पियुष पांडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे.
निवडणूक आयोगाने सिद्धनाथ गुप्ता यांची राज्याचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती केली. अजय कुमार नंदा (आयपीएस-१९९६) यांची कोलकाता पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नटराजन रमेश बाबू (आयपीएस-१९९१) यांची सुधारात्मक सेवा विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अजय मुकुंद रानडे (आयपीएस-१९९५) यांची माहितीचे अतिरिक्त महासंचालक आणि पोलिस प्रमुख (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचारमुक्त आणि शांततेत होईल असा विश्वास व्यक्त केला. यानंतर पुढील काही तासांतच मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक अर्थात डीजीपी आणि कोलकाता पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान २३ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी होईल. मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.