Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी (Ceasefire) झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या निर्णयाची घोषणा केली असून, दोन्ही देशांनी पुढील १४ दिवस कोणत्याही लष्करी कारवाया न करण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजेपर्यंत इराणला कडक इशारा दिला होता. इराणने सैन्य माघारी न घेतल्यास त्यांच्या वीज प्रकल्पांवर भीषण हल्ले करून देश उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, हा दिलेला 'अल्टिमेटम' संपण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या मुत्सद्यांमध्ये यशस्वी चर्चा झाली आणि सशर्त शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे जागतिक बाजारातील तेलाचे संकट आणि महायुद्धाची भीती काही काळासाठी कमी झाली असून, आता सर्व लक्ष पुढील दोन आठवड्यांत होणाऱ्या राजनैतिक हालचालींकडे लागले आहे.



अमेरिका-इराण संघर्षात चीन आणि पाकिस्तानची एन्ट्री 




अमेरिका आणि इराणमधील विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी आशियाई सत्तांनी घेतलेला पुढाकार यशस्वी ठरताना दिसत आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष तूर्त शांत करण्यामागे चीन आणि पाकिस्तानची मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेकडे एक सविस्तर 'शांती प्रस्ताव' पाठवला असून, अमेरिकन प्रशासनाने हा मसुदा वाटाघाटीसाठी सकारात्मक आधार म्हणून स्वीकारला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी (Ceasefire) लागू झाली असून, प्रत्यक्ष चर्चेची फेरी १० एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पार पडणार आहे. या बैठकीत इराण आणि अमेरिकेचे उच्चपदस्थ प्रतिनिधी आमनेसामने बसून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तानमार्फत पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जगावर ओढवलेले युद्धाचे सावट आता काहीसे दूर झाले आहे.



इराणने कोणत्या 10 अटी घातल्या?


१. अहिंसेची शपथ: दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध बळाचा वापर न करता अहिंसेचे पालन करण्याचे मान्य करावे.


२. होर्मुजवर इराणची सत्ता: जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचेच नियंत्रण कायम राहील.


३. युरेनियम संवर्धन: इराणला स्वतःच्या अणूप्रकल्पांसाठी युरेनियम संवर्धन सुरू ठेवण्याची अधिकृत परवानगी मिळावी.


४. प्राथमिक निर्बंधांचा अंत: अमेरिकेने इराणवर थेट लादलेले सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध तात्काळ हटवावेत.


५. दुय्यम निर्बंधांची समाप्ती: इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवर अमेरिकेने लावलेले सर्व दुय्यम निर्बंध रद्द करावेत.


६. UN ठरावांना स्थगिती: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराणविरुद्ध पास केलेले सर्व जुने ठराव अंमलात आणणे थांबवावे.


७. गव्हर्नर्स बोर्डाचे ठराव रद्द: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) गव्हर्र्नर्स बोर्डाने इराणवर घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती द्यावी.


८. आर्थिक नुकसानभरपाई: निर्बंध आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई अमेरिकेने द्यावी.


९. अमेरिकन सैन्याची माघार: मध्य-पूर्वेतील (Middle East) देशांमधून अमेरिकेने आपले सर्व सैन्य तुकड्या आणि तळ कायमचे काढून घ्यावेत.


१०. हिझबुल्लाह युद्धविराम: लेबनॉनमधील हिझबुल्लाह विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षासह मध्य-पूर्वेतील इतर सर्व युद्ध आघाड्यांवर पूर्णपणे युद्धविराम व्हावा.



पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ काय म्हणाले?


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले की, दोन्ही देश आणि त्यांचे मित्रराष्ट्र लेबनॉनसह सर्वच आघाड्यांवर तातडीने युद्धविराम (Ceasefire) करण्यास तयार झाले आहेत. हा निर्णय आजपासूनच अंमलात येणार असून यामुळे मोठा रक्तपात थांबला आहे. पंतप्रधान शरीफ यांनी दोन्ही देशांच्या नेतृत्वाने दाखवलेल्या समंजसपणाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. केवळ युद्ध थांबवणे हेच उद्दिष्ट नसून, सर्व वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. यासाठी शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांना शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या विशेष बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये एका निश्चित आणि दीर्घकालीन शांतता करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?


जगावर घोंगावणारे महायुद्धाचे संकट काही काळासाठी टळले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील सर्व संभाव्य बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाया दोन आठवड्यांसाठी स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी ही घोषणा करताना अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की, हा एक 'द्विपक्षीय युद्धविराम' (Bilateral Ceasefire) असून दोन्ही देशांनी शांततेसाठी पाऊल उचलले आहे. आपल्या निर्णयाचा उलगडा करताना ट्रम्प यांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या विनंतीचा मान राखून आज रात्री इराणच्या दिशेने झेपावणारी विनाशकारी लष्करी शक्ती त्यांनी थांबवली आहे. मात्र, यासाठी ट्रम्प यांनी 'होर्मुझची सामुद्रधुनी' तात्काळ आणि सुरक्षितपणे व्यापारी वाहतुकीसाठी खुली करण्याची कडक अट इराणसमोर ठेवली आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. आता केवळ युद्ध नको, तर दीर्घकालीन शांतता हवी आहे. त्यांना इराणकडून एक '१०-कलमी प्रस्ताव' प्राप्त झाला असून, हा प्रस्ताव पुढील वाटाघाटींसाठी एक भक्कम आधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इराणमधील बहुतेक जुन्या विवादांवर एकमत झाले असून, राहिलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी आणि कराराला अंतिम रूप देण्यासाठी हे दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. "मध्य-पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना या दशकांनुुवर्षे चाललेल्या संघर्षावर तोडगा काढण्याची संधी मिळणे, हा माझा सन्मान आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भावना व्यक्त केली. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेतील तणाव कमी झाला असून, आता संपूर्ण जगाचे लक्ष १० एप्रिलला होणाऱ्या इस्लामाबादमधील बैठकीकडे लागले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.