Iran - America War : अमेरिकेविरुद्ध इराणचा नवे घातक शस्त्र वापरण्याचा इशारा

पश्चिम आशियातील परिस्थिती झपाट्याने बिघडताना दिसत आहे. इराण ने अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका नव्या आणि भीती निर्माण करणाऱ्या शस्त्राच्या वापराची उघड धमकी दिली आहे. इराणी नौदल प्रमुख शहराम इरानी यांनी सरकारी माध्यमांशी बोलताना सांगितले की इस्लामिक गणराज्य लवकरच असे शस्त्र वापरणार आहे, ज्यामुळे शत्रू घाबरून जाईल. त्यांनी असेही म्हटले की हे शस्त्र शत्रूच्या अत्यंत जवळ तैनात आहे आणि उपरोधिक टिप्पणी करत म्हणाले की, “आशा आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येणार नाही.”


इराणी कमांडरने अमेरिकन धोरणावरही टीका करत सांगितले की आर्थिक दबाव आणि तेल व्यापार रोखून तेहरानला चर्चेच्या टेबलावर आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यांच्या मते, शत्रू देशांना वाटले होते की ते अल्पावधीत आपले उद्दिष्ट साध्य करतील, मात्र आता हीच गोष्ट लष्करी अकादम्यांमध्ये विनोदाचा विषय बनली आहे. हि धमकी अशा वेळी देण्यात आली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा तो प्रस्ताव नाकारला, ज्यामध्ये होर्मुज जलडमरूमध्य पुन्हा खुला करण्याच्या बदल्यात अमेरिकन नाकेबंदी उठवण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावात इराणच्या अणुकार्यक्रमावरील चर्चाही पुढे ढकलण्याचा सल्ला होता, जो अमेरिकेने पूर्णपणे फेटाळला.



इराणी कमांडरने दावा केला की इराणी सैन्याने अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजावर किमान सात क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यामुळे काही काळासाठी त्या जहाजावरून विमान उड्डाणे किंवा हवाई कारवाया करणे अशक्य झाले. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.इराणने असेही म्हटले की अमेरिका आणि इस्रायलने युद्ध सुरू केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 100 हून अधिक प्रत्युत्तरात्मक हल्ले केले आहेत, जे पश्चिम आशियातील अमेरिकन आणि इस्रायली तळांवर केंद्रित होते.


प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुज जलडमरूमध्य बंद करण्याचा निर्णय घेतला, जो जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. सामान्य परिस्थितीत जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल याच मार्गाने वाहतूक केले जाते. इराणने दावा केला की त्यांनी हा जलमार्ग अरब सागराच्या दिशेने बंद केला आहे आणि आता शत्रू देशांच्या तसेच त्यांच्या सहयोगी जहाजांना ये-जा करण्यासाठी इराणी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत आहे. कमांडरने इशारा दिला की जर कोणतेही जहाज जवळ आले, तर तात्काळ लष्करी कारवाई केली जाईल. मात्र, नाकेबंदी असूनही काही जहाजे इराणी बंदरांमधून निघाली असून काही आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यात यशस्वी झाली आहेत.



इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकन कारवाईला बेकायदेशीर जप्ती ठरवत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन सैन्याने इराणी जहाजे ताब्यात घेऊन त्यांच्या चालक दलाला आणि त्यांच्या कुटुंबियांना ओलीस ठेवले आहे. त्यांनी याला केवळ समुद्री दरोडा नव्हे, तर अपहरण असल्याचे म्हटले आणि अमेरिकन शक्तींना सोमालियन समुद्री चाच्यांपेक्षाही वाईट ठरवले. त्यांच्या मते, सोमालियन चाचे गरिबीमुळे असे कृत्य करतात, मात्र अमेरिकेने त्यात ओलीस बनवण्यासारखा गुन्हाही जोडला आहे.


त्यांनी शेवटी असेही स्पष्ट केले की युद्धात मृत्यू पावलेल्यांचा बदला शेवटच्या थेंबापर्यंत घेतला जाईल आणि शत्रूंना असा जबरदस्त धक्का दिला जाईल, ज्याचा त्यांना कायम पश्चात्ताप होईल.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.