केल्याने होत आहे रे...

- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे


केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! ही ओळ वर्षानुवर्ष आपण ऐकत आलेलो आहोत. या उक्तीप्रमाणे माणूस जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही करत राहतो. तो त्याचा स्थायीभाव आहे आणि करायलाही हवे. जे चांगले आहे ते नक्की निवडावे. आपल्या अवतीभोवती काही लोकांना मात्र नेहमीच फुशारकी मारण्याची सवय असते. जेव्हा बघावं तेव्हा मी हे करेन! मी ते करेन! करायचं तर काहीच नसतं! काय केलं तर आपण आदर्श ठरू? काय केलं तर आपण आपलं स्वतःचं, इतरांचं भलं करू? आपल्या कार्यामध्ये नोकरी, धंदा, शिक्षण, प्रगती, छंद, खेळ, कला कौशल्य आणि सर्वच क्षेत्रांत यशस्वी ठरू! हे प्रत्येकाने ठरवावं आणि तसं वागावं. पण काही लोक फक्त ठरवतात आणि वागत नाहीत. त्याबद्दल आपण विचार पाहणार आहोत.


एकदा का मनाशी ठिय्या केला, चंग बांधला की ते आपण करतोच, अशी जिद्द असली पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आत्मविश्वास, चिकाटी. आपण ठरवलेल्या प्रत्येक कामामध्ये हे करायचंच हे ठामपणे आपल्या मनाला निक्षून सांगायचं आणि यश िमळेपर्यंत शांत बसायचं नाही. कारण “क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे” केवळ बडबड करून काहीही होत नाही. त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी स्वतःचा रस्ता निर्माण करावा लागतो. त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो. सातत्याने दिवस-रात्र ते कष्ट करावे लागतात. कर्तव्यतत्पर व्हावे लागते आणि मगच आपण “आधी केले मगच सांगितले” इथपर्यंत पोहोचतो. हा असा प्रवास आहे. कष्टाचा, मेहनतीचा आणि कर्तृत्वाचा.


आपल्या जीवनात सातत्य महत्त्वाचे आहे. क्रिया म्हणजेच सातत्य आणि सातत्य म्हणजे क्रिया. सचोटीने, निरंतर अथकपणे, अखंडपणे न थांबता करणे. आपल्या मनाशी खुणगाठ बांधा की मला ही गोष्ट करायची आहे.मी करणारच! हाती घेतलेले काम तडीस नेणे ही जिद्द महत्त्वाची असते. मनाला संकल्प सोडला की आपली स्वप्नं आपण पूर्ण करू शकतो. पण असे नाही की संकल्प सोडला आणि पारायण झालेच नाही. अॅडमिशन घेतले पण अभ्यास केलाच नाही. पाया खणला घर अपूर्णच राहिले. हे अर्धवट, धरसोड वृत्तीचं एक लक्षण आहे. रोजच्या जीवनात आपण एका जागेवर बसून केवळ आणि केवळ स्वप्न पाहण्यात वेळ घालवतो. आजकाल तर प्रत्येक स्त्री-पुरुष, मुलं-मुली किंवा पिढी सोशल मीडियावर इतके अॅक्टिव्ह झाले आहेत की दुसऱ्याचे रील पाहून पाहून वेडे होतात. स्वतःचा अनमोल वेळ, शक्ती वाया घालवतात. हीच ऊर्जा जर दुसऱ्या ठिकाणी कामी लावली तर निश्चित त्यातून काहीतरी चांगले आपण साध्य करू शकतो आणि वेळेचा सदुपयोग होऊ शकतो. पण ही रील बघून सुधारणा काडीची होत नाही. बदल काही नाही. त्यांचे अनुकरणही नाही. आपल्या डोक्याचे खोबरे करून घेणं इतकंच!
उदाहरणार्थ एखादी महिला दिवसाला ३५ रेसिपीस पाहते पण घरी मात्र उठून फक्त खिचडी व पुलाव बनवते. आहे ना हास्यास्पद! आपल्याला काय येते? काय केले पाहिजे? किती वेळ तुम्ही कशावर घालवता? त्यातून काही निष्पन्न होते का? शेवटी ‘तेल गेले तूप गेले, हाती आले धुपाटणे’ आपण आपल्या मनाला सुद्धा फसवत असतो. मी हे करेन, मी ते करीन, उद्या करीन, मग करीन आणि ती कधीच होत नाही. म्हणून हा वेळेचा दुरुपयोग थांबवा. वेळीच सावध व्हा!


अजून एक काळ आलेला आहे ४० प्लस, फिफ्टी प्लस. मग यांनी काय करायचं! तरुण दिसण्यासाठी जिम लावायची. स्त्री आणि पुरुष दोघांनी. जिमला जायचं भरपूर कामातून एक तास बाजूला काढायचा. काढला तर फार उत्तम पण तिथे जाऊन काय करणार खरंच तुम्ही जिम करताय का? माझ्या दृष्टिक्षेपात आलेली गोष्ट. एक तास केवळ आणि केवळ मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करणं. गप्पा मारत बसणं. आहे तो वेळ जरा एकांत मिळतो घरच्यांपासून, ऑफिसपासून आणि इतर सवंगड्यापासून मग बीएफ काय आणि जीएफ काय टाईमपास. रोज एक तास आयुष्यातला आपण नाहक व्यर्थ घालवतोय. तेही समाज अमान्य वृत्तीला. चॅटिंग करून स्वतःला फसवणे आणि दुसऱ्याला फसवणे शेवटी एक ना एक दिवस सारं काही थांबणारच आहे. शुद्ध मनाने, सुज्ञपणे वेळीच सावध व्हावे. अतिशय विकोपाला गेलेले घृणास्पद संबंध. समाजाला रसातळाला नेत आहेत. आपण यातून नेमकं घेतोय काय विष? टॉक्सी रिलेशन्स!


आता अजून एक दुसरा विषय. म्हणायचा तर मीडियावरती पाहिले जाते. पर्यटन क्षेत्र, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, भटकंती, दौरे, सहली, माहितीसाठी ते बघत असतो. पण तासनतास पाहूनही त्या माहितीचे स्वरूप काही आपल्याला अनुभवता येत नाही, तर माहितीचं काय लोणचं घालायचं आहे का? प्रवास करा, प्रवासातील नित्याचा रोजचा वेगळा अनुभव जोपासा. तो प्रवास करत असताना तुम्हाला आलेले काही सुखद क्षण, तुम्ही गोळा केलेली माहिती, लावलेले शोध, विज्ञान, साक्षात्कार हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मग त्या निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला कसे वाटले? हे पाहा... ही खरी गंमत आहे. गंगा पाहतोय पण गंगेत स्नान नाही. नर्मदा पाहतोय पण नर्मदेची परिक्रमा नाही. अमरनाथला जातोय पण दर्शन नाही. देवी-देवता दिसत आहेत पण आवर्तने, स्तोत्र, पारायणी याचा उपदेश नाही. लवलेशही नाही. काहीच कामाचं नाही जसं आपण मोबाईलमध्ये स्तोत्र ऐकतो. त्यापेक्षा निदान आपल्या वाणीतून, मुखातून, मुखोद्गत असलेले ते बोला. ते रोज स्वतःच स्वतः ऐका. सराव होईल. पाठ होईल आणि या पाठांतरातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल. म्हणूनच रोजच्या रोज घरी आरती करा. स्तोत्र पाठपठण करा. आपले दिवसातील काही तास केवळ आणि केवळ जर सोशल मीडियावर जात असतील तर त्यातून आपण निश्चित चांगला मार्ग स्वीकारावा जेणेकरून आपल्यासह इतरांचे भले होईल. शेतकरी कष्ट करतो, बियाणे पेरतो, मशागत करतो आणि म्हणून शेती निर्माण होते, पीक निर्माण होतं, अन्नधान्य निर्मिती होते, नाही तर ती केवळ मातीच असते.


मूर्तिकार नको असलेला मूर्तीतील भाग काढून टाकतो आणि सुंदर देवाची प्रतिमा घडवतो नाही तर... तर केवळ दगड असताे. सुवर्णकार सोन्याच्या सुंदर नाजूक नक्षीदार कलाकृती घडवतो. नाही तर... तो सोन्याचा गोळाच असतो. शिक्षक विद्यार्थ्यांचे अनेक व्यक्तिमत्त्व घडवतात. आयुष्याला कलाटणी देतात. जीवनाला अर्थ देतात. नाही तर... ती मुलंच राहिली असती. लेखक, साहित्यिक मंडळी मनातल्या कल्पना, वेदना, भावना, अनुभव आंतरिक ऊर्मीसह शब्दांतून साकारतात, नाही तर... त्या मुक्याच राहिल्या असत्या. एखादा वक्ता खूप सुंदर बोलतो, त्याची संदेश बोधकथा, सुविचार, श्रोतू वर्गाला भारावून टाकतात. प्रत्येक क्रियेमध्ये केल्याविन होत नाही. कष्टापासून फळ नाही. काही साध्य होत नाही. हे यातून नमूद करावेसे वाटते.

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व