परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; जागतिक पर्यावरण दिनी राज्यव्यापी आधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'च्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, स्वच्छ आणि दर्जेदार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व प्रमुख बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहांची आता दर चार तासांनी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नियमित स्वच्छता केली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे राज्यातील सर्व बसस्थानके आणि बसेस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणांनी स्वच्छ करून ती प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी यावेळी जाहीर केले.
परळ बसस्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी आणलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "एसटी ही केवळ एक वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यामुळे त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही मोहीम प्रवाशांना एक नवा आणि आनंददायी अनुभव देईल." ही स्वच्छता मोहीम एक दिवसापुरती मर्यादित नसून, ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीवर आणि स्वच्छतेच्या दर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित देखरेख ठेवली जाईल, यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.
प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचे पुनर्वापरासाठी संकलन
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रत्येक बसस्थानकावर गोळा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या कचऱ्यात न टाकता त्या संकलित केल्या जाणार आहेत. हे प्लास्टिक पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठविण्यात येणार असून, या प्रक्रियेतून विविध टिकाऊ व उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतील, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याशिवाय प्रत्येक बसस्थानकावरील स्वच्छतेचे नियोजनबद्ध निरीक्षण केले जाईल आणि प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना व अभिप्रायांना (फीडबॅक) प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन्स






