स्वच्छंदी पक्ष्यांच्या आठवणी

आमच्या जायच्या-यायच्या रस्त्यावर ‘लव्हबर्ड्स’ विक्रीचे एक नवे दुकान सुरू झाले, तेव्हा माझी मुलगी साधारणपणे पाचवी - सहावीत शिकत होती. नेहमी खाली उतरल्यावर हमखास दुकानापाशी जायचा तिचा हट्ट असायचा. हिरवे निळे, पिवळे पक्षी किलबिलत तिथल्या मोठ्या पिंजऱ्यात उडत बसायचे. एकमेकांना टोचत बसायचे आणि पिंजऱ्यातले दाणे पुन्हा - पुन्हा टिपायचे. त्या पिंजऱ्याच्या जगात स्वतःचा जीव रमवायचे. काही दिवसांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझ्या मुलीने त्या पक्ष्यांची एक जोडी तिच्यासाठी विकत घेण्याचा हट्ट सुरू केला. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी सोपी नाही, हे सांगून झाले. पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणे मला पटत नाही, हे सांगून झाले पण ती काही तिचा हट्ट सोडेना. शेवटी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून दोन पक्ष्यांची जोडी घरी आणली. एक हिरवा आणि एक आकाशी निळा. निळी पक्षीण एकदम शांत आणि हिरवा पक्षी खूपच दांडगट. खरे तर पोपटी - हिरव्या लोभस पक्ष्यावर खूपच लिहिण्याजोगे आहे इतका तो स्वयंभू होता. या पक्ष्यांनी आमच्या घरात उदंड आनंद आणला. नोकरीच्या चक्राला बांधून घेतलेल्या मला या पक्ष्यांनी मोठा दिलासा दिला कारण त्यांच्या सोबतीने लेक घरी एकटे राहायला शिकली. आपण दिवे घालवले की मस्तीखोर मुले जशी शांतपणे पांघरुणात शिरतात, तसे अखंड चिवचिवणारे हे पक्षी पंखात चोची खुपसून शांत झोपी जायचे. त्यांच्या पिंजऱ्यात बसायच्या जागा देखील ठरलेल्या होत्या. त्यांचे धान्य, पाणी या जबाबदाऱ्या लेकीने घेतल्या. ही पिकू-पिलूची जोडी तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये चांगलीच प्रिय होती. या दोघातली पक्षीण गेली तेव्हा पक्षी एकटा राहू नये म्हणून त्याच्यासाठी पिवळ्या रंगाची पक्षीण निवडून आणली. पक्ष्याचा स्वभाव असा मुजोर की दोघींनी जीव लावूनही त्याने काही हेका सोडला नाही. तो शेवटपर्यंत दिमाखात जगला. या तीन पक्ष्यांचे दुःख सोसल्यावर नवा पक्षी घरी आणायचा नाही, हे आम्ही पक्के ठरवले.

 



मधल्या काही वर्षांनंतर एका पोपटाचे जखमी पिल्लू इमारतीच्या प्रांगणात पडलेले मुलांना सापडले नि आमच्याकडे पक्ष्याचा पिंजरा असणार म्हणून मुलांनी ते आमच्याकडे आणले. लेकीने त्याचे डॉक्टरी इलाज इमाने इतबारे केले. हे पिल्लू उडत नव्हते. त्याच्या पंखात बळ येण्याची आम्ही वाट पाहत होतो. महिनाभरात त्याचा आम्हाला चांगलाच लळा लागला. हळूहळू खिडक्या बंद करून माझ्या मुलीने त्याला घरात उडायला शिकवले. त्याला फार उंच उडता येत नव्हते. आता लेक मोठी झाल्याने पिंजऱ्यात या पोपटाला बंद ठेवायचे नाही हे तिने पक्के ठरवले होते. मात्र त्याचे जातभाई परत त्यांच्यात घेतील का ही काळजी होती. हळूहळू ती त्याचा पिंजरा गच्चीत घेऊन जाऊ लागली. पिंजऱ्याचे दार उघडून ठेवले तरी तो बाहेर येईना. या प्रयोगादरम्यान एकदा गच्चीजवळ आलेल्या फांदीवर पोपटांचा थवाच दिसला. मुलीने पिंजऱ्याचे दार उघडले. आतला पक्षी झाडावरच्या पक्ष्यांशी त्यांच्या भाषेत काहीतरी बोलू लागला नि एका क्षणी तो उडून त्या फांदीवर गेला. त्यांच्यात मिसळून गेला. झाडांच्या हिरव्यागार पानातून तो कितीतरी वेळ माझ्या मुलीकडे पाहत होता. जणू तो तिचे आभार मानत होता. एका क्षणात झाडाच्या दिशेने त्याने भरारी घेतली होती. हा आनंद पुढे आम्हाला कित्येक दिवस पुरला. अनंत काणेकरांचा एक लेख नुकताच माझ्या वाचनात आला आणि पक्ष्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. ‘पक्षी म्हणती ज्या आपुला’ या त्यांच्या लेखात ते म्हणतात, “नेहमी आकाशात, दिव्य वातावरणात विहार करीत असल्यामुळे की काय शुद्ध निर्मळ मनाचा माणूस पाखरं अचूक ओळखतात.



काणेकरांनी लोकमान्य टिळकांच्या मंडाले तुरुंगातील वास्तव्याचा संदर्भ या लेखात दिला आहे. माणसांना अतिशय उग्र, वज्रकठोर, वाटणाऱ्या टिळकांच्या अंगा खांद्यावर पाखरं खुशाल उडायची, नाचायची. टिळक आपले जेवण सुरू असताना पाखरांना देखील दाणे घालायचे. काणेकर त्यांच्या लेखात शेवटी म्हणतात, “पाखरं भलत्याच माणसाच्या आसपास मुळीच फिरकणार नाहीत म्हणूनच तुकारामबुवांच्या शब्दांत थोडा फेरफार करून मी म्हणेन,
पक्षी म्हणती ज्या आपुला।
बसती ज्यांच्या खांदागळा॥
तोचि साधु ओळखावा।
देव तेथेचि जाणावा॥
काणेकरांचा हा लेख मला शंभर टक्के पटला. काही वर्षांपूर्वी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या लव्हबर्ड्सबद्दलचा एक लेख वाचल्याचे मला स्मरते आहे. त्या लेखाचा शोध लागला, तर पक्षीप्रेमाचे आणखी काही कंगोरे नक्की सापडतील.
Comments
Add Comment

Janmashtami 2026 : जन्माष्टमीचा उपवास करताना अशक्तपणा टाळण्यासाठी 'या' सोप्या आहार टिप्स, शरीर राहील निरोगी आणि ऊर्जावान!

जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. या पवित्र दिवशी अनेक भाविक दिवसभर

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड फक्त बाईकच नाही, तर टी-शर्टपासून बूटांपर्यंत सर्व काही विकते; जाणून घ्या किंमती आणि कंपनीची कहाणी

मुंबई : रॉयल एनफिल्डच्या बाईक्स (Royal Enfield) त्यांच्या दमदार लूक आणि रॉयल अंदाजासाठी ओळखल्या जातात. मात्र, कंपनी केवळ

Krishna Janmashtami 2026 : बाळगोपाळाच्या पूजेचा 'हा' सर्वोत्तम मुहूर्त कमी लोकांना माहित; जाणून घ्या योग्य वेळ आणि पूजा पद्धत!

श्रावण आणि भाद्रपद महिन्यांचे आगमन म्हणजे भारतीय संस्कृतीत विविध धार्मिक सण-उत्सवांची पर्वणीच असते. या काळात

Indian Avocado Benefits : जाणून घ्या भारतीय अवाकाडो खाण्याचे ७ जबरदस्त फायदे; हृदय, डोळे आणि पचनासाठी ठरते फायदेशीर!

मुंबई : गेल्या काही वर्षांत अवाकाडो हे फळ भारतीयांमध्येही लोकप्रिय होत आहे. टोस्ट, सलाड, सँडविच, डिप्स आणि स्मूदी

Hair Growth Juice : केसांच्या वाढीसाठी हे 7 ज्यूस ठरतील फायदेशीर; डाएटमध्ये करा समावेश

केस गळणे किंवा केसांची वाढ मंदावणे यामागे अनेक कारणे असू शकतात. संतुलित आहारातून शरीराला पुरेसे प्रोटीन,

Gokulashtami naivedya recipes : गोकुळाष्टमी विशेष : बाळकृष्णाला प्रिय असणारे 'हे' ६ पारंपारिक नैवेद्य; जाणून घ्या महत्त्व आणि सोपी रेसिपी

श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या