नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज आपल्याकडे, माझ्या कलिकेचा सुवास बादशहापर्यंत पोचलाय’’ कान्होपात्राची आई शामाबाई कान्होपात्राशी बोलत होती. पण तिची ती कलिका - कान्होपात्रा - ही सरदार, बादशहा यांचे नाव ऐकताच कोमेजल्यासारखी झाली. तिचा मनातल्या मनात आक्रोश सुरू झाला... हा सरदार मला बादशहाकडे घेऊन जाण्यासाठीच येणार, तेव्हा आता मी काय करू, बादशहाने बोलावले म्हणून आईला केवढा आनंद झालाय, पण मला मात्र ही अशी तनामनाला विकण्याची कल्पनाही सहन होत नाहीय, हे नश्वर शरीरसुख नकोय मला, त्या अनादिअनंताशी तादात्म्य पावण्याचे आत्मसुख हवेय.




मंगळवेढे या गावी शामा नावाच्या एका अतिशय धनवान नायकिणीच्या पोटी कान्होपात्राचा जन्म झाला. जशी भांगेत तुळस उगवली. एखाद्या प्रासादासारखा शामाचा भव्य वाडा होता. त्यात सेवेला तत्पर अशा अनेक दासी पदरी होत्या. पण त्या सुखोपभोगात कान्होपात्राचे मन रमत नव्हते. कान्होपात्राने आपल्यासारखाच गणिकेचा व्यवसाय पुढे चालू ठेवावा, म्हणून शामाने कान्होपात्रेला लहान वयापासूनच नृत्यगायनात प्रवीण केले होते. कान्होपात्रा विलक्षण देखणी असल्याने त्या सौंदर्याच्या बळावर तिने आपल्यापेक्षाही अधिक धन मिळवावे, असे तिच्या आईला वाटे. पण कान्होपात्रेचे मन या बाजारू दुनियेत मुळीच रमणारे नव्हते. सर्व ऐहिक सुखाच्या राशी जरी प्राप्त झाल्या तरी आपल्याला हवे असणारे मानसिक समाधान त्यात लाभणार नाही, हे कान्होपात्रा जाणत होती. इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या पल्याड असलेल्या आत्मिक सुखाची तिच्या जीवाला आंस लागली होती. बैचेन अवस्थेत ती आपल्या महालाच्या मागील अंगणात आली. “जय जय विठोबा रखुमाई...” असा गजर करीत पंढरीचे वारकरी जात असलेले तिला दिसले. त्यांचा तो गजर कान्होपात्रेच्या अंतःकरणालाच साद घालीत होता. घरादाराच्या, रूपागुणांच्या पाशाला ओलांडून शुद्ध आनंद देणारा हा विठुनामाचा गजर आहे, हे कान्होपात्रेच्या ध्यानी आले. एका अनोख्या उत्कट भावनेने तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिची ही अवस्था तिच्या हौसा नावाच्या एका प्रौढ दासीने ओळखली. तिने कान्होपात्रेचे उंची वस्त्रालंकार उतरवून तिला साधे कपडे घातले आणि त्या दोघी कोणाला नकळत चटकन त्या वारीमध्ये मिसळून गेल्या. वारकऱ्यांसह भजने गाऊ लागल्या. त्या भजनांतील गाढ भक्तिरसात चिंब होत त्या पंढरपूरला जाऊन पोहोचल्या. गरीब हौसा आता कान्होपात्रेची आईच झाली होती. विठ्ठल मंदिराजवळच त्या दोघींनी एक झोपडी बांधली आणि पांडुरंगनगरीत त्या आनंदाने राहू लागल्या. कान्होपात्रेने आता आपले अवघे आयुष्य विठ्ठल मंदिराच्या सेवा-चाकरीत काढायचे, असा निश्चय केला होता. दिवसातून दोनदा ती विठ्ठलाचे संपूर्ण मंदिर झाडून-पुसून लख्ख करीत असे. ते काम करीत असताच तिला भक्तिभावयुक्त काव्य स्फूरू लागले. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली. तिची ती भावपूर्ण मधुर भजने देवळात येणारी भक्तमंडळी तल्लीन होत ऐकू लागली.





  • कान्होपात्रा गात होत्या,
    सकळही सुरवर येथेचि लाधले ।
    देवाचे देखिले चरणांबुज ।। १।।
    हरली ती भूक तहान निमाली ।
    संतांची देखिली चरणांबुजे ।। २।।
    कीर्तनाचे रंगी आनंद नाचता ।
    कान्होपात्रा चित्ता समाधान ।। ३।।
    या पंढरीला सगळ्या देवांचे दर्शन झाले कारण सर्वांना विठ्ठलाने आपल्यात सामावून घेतलेय. देवाधिदेव परमात्मा पांडुरंगाचे चरणकमल मी आज पाहिले. जीवभावाचा निरास करून ब्रह्मभाव प्रदान करणाऱ्या संतांचे चरणकमल पाहिले. त्यांना
    शरण गेल्याने देहभान हरपून भूक-तहान
    आपोआपच निमाली.
    कान्होपात्रांचे मोजकेच अभंग उपलब्ध आहेत. पण त्यातून त्यांच्या पारमार्थिक साधनेचे पूर्ण दर्शन होते. त्या कृष्णाला पुढीलप्रमाणे आळवतात,
    माझ्या जीवीचे जीवलगे
    कृष्णाई कान्हाई ।।
    सावळे डोळसे करूणा
    येऊ दे काही ||
    कान्होपात्रांचा पुढील अभंगही प्रसिद्ध आहे, ज्यात केवळ भगवंताला अंतःकरणापासून घातलेली साद आहे –
    अगा वैकुंठीच्या राया रे अगा विठ्ठल सखया..
    अगा पुंडलिक वरदा । अगा विष्णू तू गोविंदा ।।
    कान्होपात्रांच्या अनन्य विठ्ठलभक्तीची साक्ष त्यांच्या पुढील शब्दाशब्दातून पटते,
    माझ्या जीवीचे जीवन । तो विठ्ठल निधान ।।
    उभा असे विटेवरी । वाटी प्रेमाची शिदोरी ।।
    माझ्या जीवाचे जीवनचैतन्य असलेला विठ्ठल म्हणजे आत्मसुखाचा ठेवा आहे, असे त्या म्हणतात. त्यांच्या अभंगातून त्यांचा विनम्र भाव विलोभनीयतेने प्रकट होतो.
    मी तो आहे यातिहीन । नकळे काही आचरण ।।
    मज अधिकार नाही । भेटी दे विठाबाई ।।
    मी हीन जातीची, थोरामोठ्यांशी कसे वागावे, मला माहीत नाही. अशा मला त्रैलोक्यनाथाला भेटण्याचा अधिकार कसा असेल, पण तरीसुद्धा माझी भोळीभाबडी भक्ती पाहून हे विठ्ठलमाऊली तू मला तुझी भेट दे. तुझ्या चरणापाशी स्थान दे, असे कान्होपात्रा विठ्ठलाला विनवितात. त्याचबरोबर इतर संसारी जनांनाही त्या सांगतात,
    घ्यारे घ्यारे मुखी नाम । अंतरी धरोनिया प्रेम ।।
    माझा आहे भोळा बाप । घेतो ताप हरोनि ।।
    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांवरचा कान्होपात्रांचा अभंगही लक्षणीय आहे. कान्होपात्रा ज्ञानेश्वरांच्या अलौकिक भक्तिज्ञानाच्या कर्तृत्वाने भारावून गेल्या. तेव्हा पुढील अभंग यांच्या मुखातून
    बाहेर पडला,
    आलंकापुरी पुण्यठाव ।
    तेथ समाधी ज्ञानदेव ।। १।।
    पांडुरंगे दीधला वर ।
    भेटी निर्धार कृष्णपक्षी ।। २।।
    नित्य स्नानालागी जाणा ।
    भागीरथी दिधली ज्ञाना ।। ३।।
    जेथे साक्षात पावनता निवास करते, अशा आळंदीनगरीत ज्ञानदेवांची समाधी आहे.



कृष्णपक्षात आपली नक्की भेट होणार, असा ज्ञानोबांना पांडुरंगाने वर दिला होता. त्याप्रमाणे कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८ या परम मंगल दिवशी ज्ञानेश्वरमाऊली संजीवन समाधीद्वारा विठ्ठलपरमात्म्याशी एकरूप झाली! भागीरथीसमान पवित्र असलेल्या इंद्रायणी नदीकिनारी ज्ञानराजांची समाधी आहे. त्यामुळे कान्होपात्रा म्हणतात, ज्ञानदेवांना नित्य स्नानासाठी देवाने भागीरथी दिली!
कान्होपात्रा घर सोडून गेली, हे पाहिल्यावर बादशहाने आपल्या शिपायांना तिचा माग काढण्यास धाडले. तिच्या विठ्ठलभक्तीची माहिती कळाल्याने ती नक्कीच पंढरपुरास गेली असणार, असा विचार करून ते शिपाई पंढरपुरास आले. कान्होपात्रा अगदी साध्या वेषात असली तरी तिचे सौंदर्य लपत नव्हते. बादशहाच्या शिपायांनी तिला हुडकून काढले.
शिपाई तिला म्हणाला “कान्होपात्रा, बादशहाचा हुकूम आहे, तू ताबडतोब आमच्याबरोबर चल, बऱ्या बोलाने आली नाहीस तर आम्हाला जबरदस्तीने तुला घेऊन जावे लागेल’’
त्यावर कान्होपात्रा म्हणाली, “भाईसाब, मी मंदिरात जाऊन विठोबाचा निरोप घेऊन येते’’




शिपाई म्हणाला – काहीही बकवास करू नकोस, विठोबाचा काय निरोप घेणार?
कान्होपात्रा म्हणाली – मी भाई म्हटलंय ना तुम्हाला, आपल्या बहिणीची एवढीही विनंती ऐकणार नाही का...?
शिपाई – हं ठीक आहे. पण बघ हं, काही दगाफटका केलास तर आमच्याशी गाठ आहे.
कान्होपात्रा मंदिरात गेली. काही वेळाने मंदिरातले पुजारी बाहेर आले. त्यांना पाहून शिपाई म्हणाला – पुजारीजी, ही अजून बाहेर कशी आली नाही? आपल्याला माहीत आहे ना की बादशहाची मर्जी खप्पा झाली तर काय होईल...!
पुजारी - हवालदारसाहेब, आत कान्होपात्रा नाहीय, आहे ते तिचे निष्प्राण शरीर...
आपल्या तनामनाला अत्यंत शुद्ध ठेवीत विठ्ठलाशी एकरूप झालेल्या कान्होपात्राची एकनिष्ठ भक्ती पाहून बादशहाचा तो शिपाईही विस्मयाने थक्क झाला.




कान्होपात्रेची ही कहाणी जीवाला चटका लावते. शिपायाच्या परवानगीने मंदिरात गेलेल्या कान्होपात्रेने केवढ्या आर्ततेने विठोबाला स्वतःत सामावून घेण्यासाठी विनविले असेल, हे तिच्या –
नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।
या हृदय पिवटळून म्हटलेल्या गीतावरून कळून येते. हरिणीच्या पाडसाला व्याघ्राने धरले असता त्या पाडसाची जी तगमग होत असेल, तेवढी तगमग असल्याशिवाय ईश्वरभक्ती पूर्णत्वास जात नाही.
आपले रूपलावण्य, धनदौलत या कशाचाही मोह न धरता केवळ परम भक्तिभावाने विठ्ठलाशी एकरूप होणाऱ्या संत कान्होपात्रांना आपण नमन करू या.


___डॉ. अनुराधा कुलकर्णी
Comments
Add Comment

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची