Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; 39 पदकांसह चौथे स्थान, बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक 7 सुवर्ण
August 3, 2026 07:47 AM
ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी करत पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. 11 दिवस चाललेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 39 पदके जिंकली. यात 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. अनेक पारंपरिक खेळ स्पर्धेत नसतानाही भारताने प्रभावी कामगिरी करत अव्वल देशांमध्ये स्थान मिळवले.
यंदाच्या स्पर्धेत भारताच्या बॉक्सर्सनी सर्वाधिक चमकदार कामगिरी केली. भारतीय बॉक्सिंग संघाने 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशा एकूण 10 पदकांची कमाई केली. याशिवाय ॲथलेटिक्स आणि पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताने 16 पदके जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये 8, ज्युडोमध्ये 4 आणि पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये 1 कांस्यपदक भारताच्या खात्यात जमा झाले.
नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी आणि टेबल टेनिस यांसारखे भारताचे पारंपरिक मजबूत खेळ यंदा स्पर्धेत नव्हते. तरीही इतर खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची लय कायम ठेवली. काही स्पर्धांमध्ये भारताने दुहेरी पदकेही जिंकली.
पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाने 171 पदकांसह अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाने 70 सुवर्ण, 45 रौप्य आणि 56 कांस्य पदके जिंकली. जलतरण आणि पॅरा-जलतरणमध्ये त्यांची सर्वाधिक कामगिरी पाहायला मिळाली.
इंग्लंडने 110 पदकांसह दुसरे स्थान मिळवले. त्यांच्या खात्यात 29 सुवर्ण, 45 रौप्य आणि 36 कांस्य पदके जमा झाली. कॅनडाने 62 पदकांसह तिसरे स्थान पटकावले. यजमान स्कॉटलंडनेही 39 पदके जिंकली. मात्र, रौप्य पदकांची संख्या कमी असल्याने त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत न्यूझीलंड सहाव्या, नायजेरिया सातव्या, जमैका आठव्या, वेल्स नवव्या आणि मलेशिया दहाव्या स्थानावर राहिले. विविध खेळांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील आपले स्थान मजबूत असल्याचे सिद्ध केले.