Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेमार्फत 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहायक आयुक्त यांनी विभाग स्तरावर या कामाचा दैनंदिन तर उप आयुक्त यांनी प्रत्येक आठवड्यातून एकदा परिमंडळनिहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरित महानगरपालिका आयुक्त यांना सादर करावा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी दर १५ दिवसाला आढावा घ्यावा. या मोहिमेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. आदेशाचे पालन करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिला आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात नुकतीच पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील पदपथांची दररोज प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणविरोधी कारवाईची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी. केवळ कारवाई करून थांबायचे नाही, तर अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत, यासाठी सातत्यपूर्ण देखरेख ठेवावी. प्रत्येक दिवसाचा 'पूर्वीचे ' व 'नंतरचे' अशा छायाचित्रांसह प्रगती अहवाल तपासणे बंधनकारक राहील. या कामात कोणतीही दिरंगाई, दुर्लक्ष अथवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भिडे यांनी दिला आहे. मुंबईतील सुमारे ५० टक्के दैनंदिन प्रवास पायी केला जातो. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे व इतर सर्व प्रकारचे अडथळे तत्काळ हटवून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करावेत. तसेच पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.


नियमानुसार नसलेले किंवा असमान रॅम्प काढून टाकावेत. इमारतींची प्रवेशद्वारे व दरवाजे हे मालमत्तेच्या हद्दीच्या आतील बाजूस उघडतील, याची खात्री करावी. पदपथावर अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांच्या फांद्यांची आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात यावी. पदपथांचे डिझाइन प्रचलित मानकांनुसार विकसित करण्यात यावे. नवीन पदपथांचे बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाइननुसार आणि एम-४० दर्जाच्या काँक्रीटमध्येच करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत पेव्हर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये. तसेच पदपथांवरील गॅप्स, पातळीतील तफावत व इतर सर्व भौतिक अडथळे दूर करून पदपथ सुरक्षित करावेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही भिडे यांनी दिले.


पदपथांवरील अतिक्रमणे हटवून ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व चालण्यायोग्य केल्यास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होईल. पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि अधिकाधिक नागरिक पदपथांचा वापर करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म