Saturday, August 29, 2026

Uday Samant : मराठी चित्रपटांतून संस्कृतीला जागतिक व्यासपीठ, मराठी भाषा मंत्री उदय सामंत; दिल्लीतील महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Uday Samant : मराठी चित्रपटांतून संस्कृतीला जागतिक व्यासपीठ, मराठी भाषा मंत्री उदय सामंत; दिल्लीतील महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली : मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या योगदानामुळे मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काढले. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’ला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ‘देऊळ बंद २’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि ‘सत्यशोधक’चे दिग्दर्शक निलेश जळमकर यांनीही प्रेक्षकांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल उपस्थित होते.

दिल्लीतील महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे सांगत सामंत यांनी महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि परंपरा देशाच्या राजधानीत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. दिल्लीत भव्य गणेशोत्सव आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच मराठी चित्रपट मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न ठेवता देशभर पोहोचवावेत. मराठी संस्कृतीशी ऐतिहासिक नाते असलेल्या तंजावर आणि बडोदा यांसारख्या शहरांतही चित्रपट महोत्सव आयोजित करण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. देशभर तसेच परदेशात चित्रपट महोत्सव आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा, माणूस आणि संस्कृतीची व्यापक ओळख निर्माण करण्यासाठी शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी आणि मराठी भाषेच्या कार्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘तुंबाडची मंजुळा’, ‘घुबाड कुंड’, ‘स्थळ’ आणि ‘फुलवंती’ हे चित्रपट दाखवण्यात आले. सकाळच्या सत्रात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. मिलिंद दामले यांनी चित्रपट अभ्यासाचे विशेष सत्र घेतले. यावेळी काही महत्त्वपूर्ण माहितीपटांचेही प्रदर्शन करण्यात आले. दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे विवेक गार्गे यांनी मंत्री सामंत यांचा सत्कार केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा