
Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये समोर आली आहे. वराच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून महिंद्रा थार एसयूव्हीची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करण्याऐवजी वधूच्या नातेवाईकांनी त्यांना थार गाडीचे एक छोटे खेळणे भेट दिले. या अनपेक्षित कृतीमुळे वराचे कुटुंबीय अवघडल्याचे वृत्त आहे. ( Meerut News)
लग्नाच्या बैठकीत थारची मागणी
ही घटना मेरठमधील सोलाना गावात शनिवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानपूर गावातील शमशेर यांनी आपल्या मुलाचे लग्न सोलाना येथील एका तरुणीशी ठरवले होते. लग्नापूर्वीच्या पारंपरिक बैठकीसाठी शमशेर यांच्यासह कुटुंबीय वधूच्या घरी गेले होते.
या भेटीदरम्यान दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नासंदर्भातील पारंपरिक पत्रांची देवाणघेवाण होणार होती. मात्र, वराच्या कुटुंबीयांनी हुंड्यात महिंद्रा थार एसयूव्हीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीला वेगळेच वळण मिळाले.
उत्तर प्रदेश – मेरठ में शादी से ठीक पहले दूल्हे ने थार मांगी तो लड़की पक्ष ने प्लास्टिक खिलौना वाली थार पकड़ाकर ये रिश्ता तोड़ दिया !! https://t.co/46M8NgVN4t
— Sachin Gupta (@Sachingupta) November 29, 2026
वधूच्या कुटुंबीयांनी दिले थारचे खेळणे
वृत्तानुसार, वधूच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांना दिवसभर घरी ठेवून त्यांचे आदरातिथ्य केले. मात्र, ते निघण्याच्या तयारीत असताना त्यांनी थार गाडीचे एक छोटे खेळणे वराच्या कुटुंबीयांच्या हातात दिले. महागडी एसयूव्ही मागणाऱ्या वराच्या नातेवाईकांना अशा प्रकारे उत्तर देण्यात आल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
हुंडा मागणे कायद्याने गुन्हा
भारतात हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 अंतर्गत हुंडा मागणे, देणे किंवा घेणे हा दंडनीय गुन्हा आहे. लग्न झाले किंवा नाही, तरी हुंड्याची मागणी केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. या घटनेत नेमकी कायदेशीर तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






