नागपूर : नागपूर शहरात दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. मनीष नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आणि तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. दुसरीकडे, केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैनिकी प्रशिक्षण केंद्रात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Nagpur Crime)
हॉटेलच्या रूममध्ये तरुणीचा मृतदेह :
मनीष नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल 'स्टेरिअस'मध्ये रात्री उशिरा २८ वर्षीय शिवानी गजभिये हिचा मृतदेह आढळून आला. त्याच खोलीत किरण आत्राम हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळला. हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी संध्याकाळी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. रात्री सुमारे दहा वाजता खोलीतून जोरदार किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली. दार उघडल्यानंतर तरुणी मृतावस्थेत, तर तरुण जखमी अवस्थेत आढळला. (Nagpur Crime)
पोलिसांनी घटनास्थळावरून एक चाकू जप्त केला आहे. प्राथमिक तपासात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणीची हत्या करण्यात आली असावी आणि त्यानंतर तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मात्र, या प्रकरणातील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. किरण आत्राम गंभीर जखमी असल्याने सध्या त्याचा जबाब नोंदवता आलेला नाही. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांकडून चौकशी केली जाणार असून, त्यातून या घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Nagpur Crime)
सैनिकी प्रशिक्षण केंद्रात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा छळ केल्याचा आरोप :
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'कमांडो अकॅडमी'मध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप समोर आला आहे. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत प्रशिक्षण केंद्राच्या संचालकावर गंभीर आरोप केले आहेत. सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली शारीरिक प्रशिक्षण घेत असताना संचालकाकडून गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपी संचालक हरिश्चंद्र राणे याला अटक केली आहे. (Nagpur Crime)
इतर विद्यार्थिनींबाबतही चौकशी :
प्रशिक्षण केंद्रातील इतर विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. या चौकशीत आणखी काही माहिती समोर येते का, याकडे लक्ष लागलं आहे. नागपूरमधील या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे. (Nagpur Crime)






