
Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी सामायिक असते. त्यामुळे मोबाईलमधील हाय-क्वालिटी फोटो, मोठे व्हिडीओ, ईमेलमधील अटॅचमेंट आणि जुन्या फाइल्स यांमुळे हे स्टोरेज लवकरच भरते. स्टोरेज पूर्ण झाल्यानंतर नवीन ईमेल येण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच फोटो आणि फाइल्स सेव्ह करतानाही समस्या निर्माण होतात.
अशावेळी अनेक जण लगेच अतिरिक्त स्टोरेजचा प्लॅन खरेदी करतात. मात्र, काही सोप्या ट्रिक्स वापरून अनावश्यक फाइल्स हटवल्यास मोफत स्टोरेजमध्येच जागा निर्माण करता येऊ शकते.
Google Drive मधील मोठ्या फाइल्स हटवा
Google Drive मध्ये मोठे व्हिडीओ, PDF आणि जुन्या फाइल्स मोठ्या प्रमाणात जागा व्यापतात. त्यामुळे Drive उघडून स्टोरेज किंवा स्टोरेज मॅनेजमेंटचा पर्याय निवडा. तिथे आकारानुसार मोठ्या फाइल्स पाहता येतात. यापुढे उपयोगात नसलेल्या किंवा ज्यांच्या प्रती आधीच मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये आहेत, अशा फाइल्स हटवा. मात्र, महत्त्वाची कागदपत्रे डिलीट करण्यापूर्वी त्यांचा बॅकअप असल्याची खात्री करा.
Google Photos मधील अनावश्यक फोटो डिलीट करा
Google Photos मध्ये ब्लर झालेले फोटो, जुने स्क्रीनशॉट आणि एकसारखे अनेक फोटो विनाकारण जागा व्यापतात. अॅपमधील स्टोरेज मॅनेजमेंट विभागात जाऊन मोठे फोटो आणि व्हिडीओ तपासा. गरज नसलेले फोटो किंवा व्हिडीओ निवडून हटवा.
याशिवाय, भविष्यातील बॅकअपसाठी 'Storage Saver' हा पर्याय निवडता येतो. त्यामुळे मूळ गुणवत्तेऐवजी कमी स्टोरेज वापरणाऱ्या स्वरूपात फोटो आणि व्हिडीओ सेव्ह होतात.
Gmail मधील मोठे ईमेल आणि अटॅचमेंट हटवा
Gmail मध्ये मोठ्या फाइल्स जोडलेले जुने ईमेल शोधून अनावश्यक अटॅचमेंट असलेले संदेश हटवा. विशेषतः जुने व्हिडीओ, PDF आणि इतर मोठ्या फाइल्स असलेले ईमेल तपासा. यामुळेही स्टोरेजमध्ये जागा निर्माण होऊ शकते.
Trash आणि Spam फोल्डर रिकामे करा
Drive, Photos किंवा Gmail मधून फाइल्स आणि ईमेल हटवल्यानंतर त्या लगेच कायमच्या डिलीट होत नाहीत. त्या संबंधित Trash किंवा Bin फोल्डरमध्ये राहतात आणि स्टोरेज वापरू शकतात. त्यामुळे गरज नसलेल्या फाइल्स हटवल्यानंतर Trash रिकामा करा. Gmail मधील Spam आणि Trash फोल्डरही तपासा.
अतिरिक्त स्टोरेजचा प्लॅन कधी घ्यावा?
तुमच्या गरजा मर्यादित असतील आणि तुम्ही नियमितपणे अनावश्यक फाइल्स हटवत असाल, तर सुरुवातीला अतिरिक्त स्टोरेज खरेदी करण्याची गरज पडणार नाही. मात्र, महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ आणि कामाच्या फाइल्सचा बॅकअप 15 GB पेक्षा जास्त असेल, तर अतिरिक्त स्टोरेज प्लॅनचा विचार करू शकता.






