Monday, August 31, 2026

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू खरातने महिलांवर अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. भोंदू खरातने महिलांचे शोषण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अशोक खरात प्रकरणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

या खटल्यासाठी सरकारने अ‍ॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी तकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती. मात्र त्यांच्याकडे राज्यातील इतर महत्त्वाच्या खटल्यांची जबाबदारी असल्याने अशोक खरात प्रकरणात ते पहिल्यांदाच सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते. मात्र, आरोपीचे वकील अ‍ॅड. राहुल कासलीवाल न्यायालयात वेळेवर उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून, आता पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. (Ashok Kharat Case)

खरातच्या आजच्या सुनावणीत काय घडलं ?

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि अ‍ॅड. अजय मिसर दुपारी 12:30 च्या सुमारास न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांचा पुकारा करण्यात आला. मात्र, आरोपीचे वकील राहुल कासलीवाल न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली.

सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की, भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या एसआयटी विभागाने लैंगिक अत्याचाराचे आठ वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. या आठपैकी अद्याप फक्त सहा गुन्हे सेशन कोर्टाकडे वर्ग करण्यात आलेत. दोन गुन्हे अजूनही मॅजिस्ट्रेट कोर्टात आहेत, लवकरच ते सेशन कोर्टात येतील अशी आशा आहे. सेशन कोर्टातील सहा खटल्यांपैकी अशोक खरातने एका खटल्यात जामीन मागीतला आहे गुन्हा हा जामीनपात्र आहे अशा प्रकारची विनंती अशोक खरातने न्यायालयाला केलेली आहे. (Ashok Kharat Case)

"त्यावर सरकारतर्फे आम्ही त्याला जामीन देऊ नये, अशी न्यायालयात विनंती केलेली आहे. त्याला जी कारणे आहेत, ती देखील आम्ही आमच्या खुलास्यात नमूद केलेली आहेत. अशोक खरात हा विविध पीडित स्त्रियांवर कशाप्रकारे लैंगिक अत्याचार करत होता आणि त्यांच्या मनात कशाप्रकारे भीतीचा बागलबुवा निर्माण करत होता, याबाबतचा सविस्तर पुरावा न्यायालयात आमच्या खुलास्यामार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या अर्जाची सुनावणी न्यायालयाने 16 सप्टेंबर रोजी निश्चित केलेली आहे. त्यावेळी त्याच्या जामीन अर्जाच्या सुनावणीवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणार आहे, यानंतर न्यायालय यासंदर्भात निर्णय देईल," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा