शामली : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन संशयितांची पोलिसांशी चकमक झाली. सोमवारी पहाटे पानिपत-कैराना महामार्गावर झालेल्या या कारवाईत पोलिसांनी मोहित आणि सुमित या दोघांना ठार केले. चकमकीदरम्यान एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. अंकित यांच्या हत्येची जबाबदारी गोगी गँगने स्वीकारली होती. ( Ankit Baliyan)
https://www.prahaar.in/2026/08/30/tamil-nadu-governments-decision-security-cover-for-former-chief-minister-stalin-reduced/शामलीचे एसपी एन. पी. सिंग यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 4 वाजता अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित शामलीच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विविध पोलीस पथकांनी त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांना चकमा देत आरोपी मन्ना माजरा परिसराकडे पळाले. हॉटेल राजमहालजवळ त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यातील एक गोळी पोलिसांच्या वाहनाला लागली. (Murder)
यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही संशयित जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतांची ओळख धर्मपाल येथील सुमित आणि हरियाणातील सोनीपतच्या राजडा गावातील मोहित अशी करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही उपचार सुरू आहेत. ( Ankit Baliyan Murder)
दरम्यान, अंकित बलियान यांची हत्या काही दिवसांपूर्वी शामलीच्या कोतवाली परिसरात एका जिमबाहेर करण्यात आली होती. जिममधून बाहेर पडून कारकडे जात असताना दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या अंकित यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता.
अंकित यांच्या पत्नी सीमा यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली होती. मारेकऱ्यांना चार दिवसांत अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली होती. तसेच अंकित यांनी पोलीस संरक्षण मागितले होते, मात्र ते मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. (UP murder Case)
या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अंकित यांच्या वडिलांशी फोनवर संवाद साधून कुटुंबाला न्यायाच्या लढाईत साथ देण्याचे आश्वासन दिले. आता चकमकीत ठार झालेल्या संशयितांचा हत्येशी नेमका काय संबंध होता, याचा तपास पोलीस करत आहेत.






