
RBI New Rules : एटीएममधून वारंवार पैसे काढणे किंवा बॅलन्स तपासणे यामुळे तुमचा बँकिंग खर्च वाढू शकतो. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी बँक शुल्क आकारू शकते. दर महिन्याला 5 अतिरिक्त शुल्कपात्र व्यवहार केल्यास ग्राहकाला वर्षभरात 1,600 रुपयांहून अधिक पैसे द्यावे लागू शकतात. ग्राहकांना या शुल्काची आधीच माहिती मिळावी, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 27 नोव्हेंबर रोजी एटीएम आणि पॉइंट ऑफ सेल (PoS) टर्मिनलमधून रोख रक्कम काढण्यासंदर्भात नवे निर्देश जारी केले आहेत.
Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ...
वर्षाला 1,600 रुपयांहून अधिक शुल्क कसे लागू शकते?
RBIच्या निर्देशांनुसार, मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर बँक प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी जास्तीत जास्त 23 रुपये शुल्क आकारू शकते. यावर 18 टक्के GST लागू झाल्यास एका व्यवहारासाठी एकूण शुल्क 27.14 रुपये होते.
उदाहरणार्थ, ग्राहकाने दर महिन्याला 5 अतिरिक्त शुल्कपात्र व्यवहार केले, तर त्याला महिन्याला 135.70 रुपये शुल्क द्यावे लागू शकते. यानुसार वर्षभरातील खर्च 1,628.40 रुपये होतो. दर महिन्याला 10 अतिरिक्त शुल्कपात्र व्यवहार केल्यास वार्षिक खर्च 3,256.80 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
RBIचा नवा नियम ग्राहकांसाठी कसा उपयुक्त?
नव्या निर्देशांनुसार, ग्राहकांनी महिन्यात किती मोफत एटीएम व्यवहार केले आहेत आणि त्यानंतरच्या व्यवहारांवर किती शुल्क आकारले जाईल, याची माहिती देणारी व्यवस्था बँकांना तयार करावी लागणार आहे. त्यामुळे मोफत व्यवहारांची मर्यादा संपण्यापूर्वीच ग्राहकांना त्याची कल्पना येईल.
तांत्रिक अडचणी, एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसणे, चुकीचा पिन किंवा बँकेशी संबंधित कारणांमुळे अयशस्वी झालेल्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाही. तसेच अशा व्यवहारांची गणना मोफत व्यवहारांच्या मर्यादेतही केली जाणार नाही.
बँकांना रोख रक्कम काढण्याची मर्यादा, लागू शुल्क आणि मोफत व्यवहारांची माहिती ग्राहकांना स्पष्टपणे उपलब्ध करून द्यावी लागेल. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी व्यवहारांचे नियोजन करता येईल.
ATMचा खर्च कसा कमी कराल?
ग्राहकांनी शक्यतो स्वतःच्या बँकेच्या एटीएमचा वापर करावा. वारंवार थोडी-थोडी रक्कम काढण्याऐवजी महिन्याच्या गरजेनुसार पैसे काढण्याचे नियोजन करावे. बॅलन्स तपासणे आणि खाते विवरण पाहण्यासाठी मोबाईल बँकिंगचा वापर केल्यास एटीएमवरील अनावश्यक व्यवहार टाळता येतील.
याशिवाय, पात्र व्यापाऱ्यांच्या PoS टर्मिनलवरूनही रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेत प्रत्येक व्यवहारासाठी 2,000 रुपये आणि महिन्याला एकूण 10,000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. शुल्क आकारल्यास ते काढलेल्या रकमेच्या 1 टक्क्यापर्यंत मर्यादित असते.





