दादरमध्ये तणाव, कार्यकर्त्यांची धरपकड
मुंबई : पुण्यात शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी मुंबईतही उमटले. अमित ठाकरे यांच्या निषेधार्थ भाजपने माहिममध्ये आंदोलनाची हाक दिली. यादरम्यान माहिम परिसरात भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धरपकड केली.
मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही एकात्मिक डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. ...
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी पुण्याच्या शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयास भेट दिली होती. या वेळी प्राचार्यांच्या केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी तो फोटो काढून टाकण्यास सांगितला होता. या प्रकरणी अमित ठाकरेंसह १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाने मंगळवारी दुपारी माहिममध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच अमित ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर मनसे कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात केली होती.
मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही एसयूव्ही १,००,००० रूपये या सुरुवातीच्या ...
या आंदोलनावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपच्या आंदोलनाला विरोध करत, "आंदोलन करायचे असेल तर आझाद मैदानात करा, इथे आलात तर तेल लावलेले बांबू तयार आहेत," असा इशारा दिला होता. दरम्यान, माहिमच्या गंगाविहार हॉटेलजवळ जमलेल्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केला आहे. "आम्ही शांतपणे आंदोलन करण्यासाठी गेलो होतो, मात्र मनसेच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि काचेच्या बॉटल्स फेकून हिंसक वातावरण तयार केले," असे महाडिक म्हणाले. जोपर्यंत हल्लेखोर मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा घेत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, शासकीय कार्यालयांमध्ये पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचे फोटो लावणे नियमानुसार बंधनकारक असताना असा विरोध करणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी अमित ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली.




