Monday, August 31, 2026

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ ऑगस्टच्या रात्री डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी वॉर्ड क्रमांक ६ मध्ये दाखल असलेल्या रुग्णाला रात्रीचे जेवण देण्यात आले होते. जेवण करत असताना त्यांना भातामध्ये झुरळ आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. (Kalwa Hospital Controversy)

रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, जेवताना सुरुवातीला त्यांना भातातील वस्तू तेजपत्त्यासारखी वाटली. मात्र ती उलटून पाहिल्यानंतर त्याचे पाय दिसल्याने ते झुरळ असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वॉर्डमधील इतर रुग्णांना सावध करत जेवण न करण्यास सांगितले.

रुग्णालय प्रशासन म्हणते, लेखी तक्रार मिळालेली नाही

रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी या घटनेबाबत अद्याप रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे सांगितले. ही माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांकडून मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून घटना खरी असल्याचे आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (Cockroach In Hospital Food)

अन्न सुरक्षा तपासणीची मागणी

'कोकण एन्व्हायर्नमेंट अँड पब्लिक वेल्फेअर सोसायटी'ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संस्थेच्या प्रतिनिधींनी रुग्णालय प्रशासनाकडे जाऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले.

संस्थेने अन्न व औषध प्रशासनाकडे रुग्णालयातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्याची आणि साठवणुकीची ठिकाणे तपासण्याची मागणी केली आहे. तसेच कीटक नियंत्रण आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कळवा येथील या पालिका रुग्णालयात ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज १००० हून अधिक रुग्णांना येथे जेवण दिले जात असल्याने अन्नाच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा मुद्दा अधिक गंभीर ठरत आहे. ( Thane Municipal Corporation)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >