मुंबई : इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Ola Electricने नवीन Ola S1Z इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. बजेट सेगमेंटमधील ग्राहकांना लक्षात घेऊन ही लॉन्च स्कूटर करण्यात आली असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹79,999 आहे. विशेष म्हणजे, ओलाने विकसित केलेले भारत सेल LFP बॅटरी तंत्रज्ञान पहिल्यांदाच ग्राहकांसाठी या मॉडेलमधून उपलब्ध करून दिले आहे.
दोन बॅटरी पर्याय उपलब्ध
Ola S1Z दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
3.1 kWh व्हेरिएंट – ₹79,999; कंपनीच्या दाव्यानुसार 179 किमीपर्यंत IDC रेंज. या मॉडेलची डिलिव्हरी डिसेंबर 2026 पासून सुरू होईल.
5.1 kWh व्हेरिएंट – ₹99,999; कंपनीच्या दाव्यानुसार 301 किमीपर्यंत IDC रेंज. या व्हेरिएंटची डिलिव्हरी मार्च 2027 पासून सुरू होणार आहे.
70 किमी/तास टॉप स्पीड
दोन्ही मॉडेलमध्ये 4 kW पीक पॉवरची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी/तास आहे. चार्जिंगसाठी 3.1 kWh बॅटरीला घरच्या चार्जरद्वारे 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास 42 मिनिटे, तर 5.1 kWh बॅटरीला सुमारे 6 तास 16 मिनिटे लागतात.
भारत सेल LFP बॅटरीची खासियत
Ola S1Z मधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारत सेल LFP बॅटरी तंत्रज्ञान हे म्हणता येईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 46-सीरीज लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी ओलाच्या बॅटरी इनोव्हेशन सेंटरमध्ये विकसित करण्यात आली आहे. या बॅटरीचे उत्पादन कंपनीच्या स्वतःच्या गिगाफॅक्टरीमध्ये केले जात आहे. इन-हाऊस बॅटरी उत्पादनामुळे खर्च कमी करून हे तंत्रज्ञान तुलनेने कमी किमतीत ग्राहकांना देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
MoveOS 5 आणि स्मार्ट फीचर्स
Ola S1Z मध्ये MoveOS 5 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये क्रूझ कंट्रोल, अॅडव्हान्स रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स मोड, GPS आणि OTA अपडेट्स यांसारखी फीचर्स मिळतात. ओला अॅपच्या माध्यमातून जिओ-फेन्सिंग, टाइम-फेन्सिंग, मोड-फेन्सिंग आणि राइडिंग डेटा यांसारख्या सुविधाही वापरता येतात.
याशिवाय, कमी जागेत स्कूटर पार्क करणे सोपे व्हावे यासाठी ‘Easy Park’ फीचर देण्यात आले आहे. अॅक्सिलरेटरचा हलका वापर करून स्कूटर पुढे किंवा मागे हलवता येते. ₹79,999 ची सुरुवातीची किंमत आणि 301 किमीपर्यंत रेंजचा कंपनीचा दावा यामुळे Ola S1Z बजेट इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये महत्त्वाचा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.