Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. झारखंडमधील रामगड जिल्ह्यात रांची-पाटणा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा समावेश आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील जांघारो गावावर शोककळा पसरली आहे.
Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!
Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये समोर आली आहे. वराच्या ...
पत्नीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिराकडे प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील बेन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांघारो गावातील विवेकानंद यांच्या पत्नी अमृता कुमारी यांची नुकतीच बिहारमध्ये शिक्षिका म्हणून निवड झाली होती. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील राजरप्पा येथील माँ छिन्नमस्तिका मंदिरात दर्शनाला जाण्याचे ठरवले होते.
विवेकानंद, पत्नी अमृता कुमारी, तीन मुले आणि आई यांच्यासह नातेवाईकही या प्रवासात सहभागी झाले होते. विवेकानंद हे माँ सरस्वती विद्या मंदिराचे संचालक असल्याची माहिती आहे.
उभ्या वाहनाला स्कॉर्पिओची जोरदार धडक
सर्वजण पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून (BR 21P 6331) प्रवास करत होते. झारखंडमधील रामगड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 33 वरील कुजू ओपी परिसरातील पांकीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अज्ञात वाहनाला स्कॉर्पिओची जोरदार धडक बसली. (Jharkhand Accident News)
धडक इतकी भीषण होती की गाडीचे मोठे नुकसान झाले आणि त्यातील प्रवासी आत अडकले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच कुजू पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
13 जणांचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक
अपघातातील जखमींना रामगड सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर 13 जणांना मृत घोषित केले. चंदन कुशवाह हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
घटनेची माहिती मिळताच रामगडचे उपायुक्त ऋतुराज, पोलीस अधीक्षक मुकेश कुमार लुनायत आणि अन्य अधिकारी घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.
पत्नीच्या नोकरीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या कुटुंबाचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने जांघारो गावासह दोन्ही राज्यांतील नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.