भारतीय चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर ‘हनुमान अंश’ हा हिंदी भक्तिपर चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी होम्बले फिल्म्सने स्वीकारली असून, 11 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटाचा ग्लोबल रिलीज होणार आहे.
नीम करोली बाबा हे भगवान हनुमानांचे भक्त आणि महान आध्यात्मिक संत म्हणून ओळखले जातात. भक्त त्यांना ‘महाराज-जी’ या नावानेही संबोधतात. प्रेम, सेवा, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या शिकवणीचा प्रभाव भारतासोबतच परदेशातील अनेक साधकांवरही पडला.
‘हनुमान अंश’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासोबतच त्यांच्या शिकवणीचा आणि भक्तांवरील प्रभावाचा वेध घेण्यात आला आहे.
Charu Asopa : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांच्या वैवाहिक नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चारूने राजीववर ...
चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. उपलब्ध बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, सुरुवातीला 10 लाख रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 26व्या दिवसापर्यंत 63.82 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. सकारात्मक वर्ड ऑफ माउथमुळे चित्रपटाच्या कमाईला वेग मिळाल्याचे वृत्त आहे.
नीम करोली बाबांचा प्रभाव अनेक प्रसिद्ध व्यक्तींवरही पडला. अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी 1974 मध्ये भारतात येऊन त्यांचा आध्यात्मिक शोध घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनीही स्टीव्ह जॉब्स यांच्या सल्ल्यानुसार कैंची धामला भेट दिल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स यांनीही आपल्या आध्यात्मिक प्रवासात नीम करोली बाबांच्या प्रभावाचा उल्लेख केला आहे.
भारतामध्येही नीम करोली बाबांच्या भक्तांची मोठी संख्या आहे. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कैंची धामला भेट दिल्याचेही समोर आले आहे.
होम्बले फिल्म्सच्या माध्यमातून ‘हनुमान अंश’ आता भारताबाहेरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कैंची धाम आणि नीम करोली बाबांच्या जीवनाशी संबंधित ही कथा आता जागतिक स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. 11 सप्टेंबरपासून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना पाहता येणार आहे.





