Wednesday, September 2, 2026

Nepal Flood 2026 : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील नागरिक बेपत्ता; नातेवाईकांच्या मदतीसाठी MMRC कडून राज्यव्यापी मोहीम

Nepal Flood 2026 : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील नागरिक बेपत्ता; नातेवाईकांच्या मदतीसाठी MMRC कडून राज्यव्यापी मोहीम

मुंबई : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याने महाराष्ट्रातील कुटुंबांची चिंता वाढली आहे. बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेणे, त्यांची ओळख पटवणे आणि मृतदेह महाराष्ट्रात परत आणण्याच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र पर्वतारोहक बचाव समन्वय केंद्राने (MMRCC) राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या महापुरातील मृतांचा आकडा १,०६६ वर पोहोचला असून ४,४६२ जण अद्याप बेपत्ता आहेत. बचावकार्याला सात दिवस पूर्ण झाले असून, खुल्या भागात अडकलेल्या नागरिकांना जिवंत शोधण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. (Nepal Flood 2026)

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या (AMGM) अंतर्गत कार्यरत असलेल्या MMRCC ला महाराष्ट्र सरकारकडून बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे. संस्थेचे जिल्हास्तरीय नेटवर्क संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करत आहे. ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारशी समन्वय साधून वापरली जात आहे. (Nepal Flood)

नेपाळ सरकार आणि काठमांडू येथील भारतीय दूतावासाकडून बेपत्ता तसेच मृत व्यक्तींची अधिकृत ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांनी ही प्रक्रिया चुकवू नये, यासाठी MMRCC कडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. ( Maharashtra Missing Persons)

कुटुंबीयांनी काय करावे?

1. नेपाळ पोलिसांचे ऑनलाइन पोर्टल तपासा

नेपाळमध्ये मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांकडून त्यांचे फोटो आणि उपलब्ध माहिती ऑनलाइन आपत्ती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाऊ शकते. त्यामुळे कुटुंबीयांनी संबंधित पोर्टलवर नियमितपणे माहिती तपासावी.

2. MMRCC चा अर्ज भरावा

बेपत्ता व्यक्तीचे नाव नेपाळ पोलिसांच्या पोर्टलवर दिसले असले किंवा दिसले नसले, तरी कुटुंबीयांनी MMRCC च्या अधिकृत अर्जाद्वारे संबंधित व्यक्तीची माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Mountaineers Rescue Coordination Centre)

अर्जामध्ये बेपत्ता व्यक्तीचे नाव, आधार किंवा पासपोर्टशी संबंधित माहिती तसेच माहिती देणाऱ्या कुटुंबीयाचे नाव, बेपत्ता व्यक्तीशी असलेले नाते आणि संपर्क क्रमांक यांसारखी माहिती मागितली जाते.

DNA तपासणीचीही शक्यता

काही प्रकरणांमध्ये फोटो किंवा इतर उपलब्ध माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होत नाही. अशा वेळी जवळच्या नातेवाईकांच्या DNA नमुन्यांच्या आधारे ओळख पटवण्याची प्रक्रिया करावी लागू शकते.

MMRCC महाराष्ट्रातील कुटुंबांकडून आवश्यक माहिती गोळा करून राज्य सरकारच्या माध्यमातून नेपाळमधील अधिकृत यंत्रणांशी समन्वय साधण्यास मदत करणार आहे. संस्थेला नेपाळच्या पर्वतीय भागात काम करण्याचा अनुभव असून, महाराष्ट्रातील कुटुंबे आणि काठमांडूतील अधिकृत ओळख प्रक्रियेदरम्यान समन्वय साधण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

संस्थेच्या माहितीनुसार, कुटुंबीयांकडून मिळणारी माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने केवळ बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवणे तसेच पार्थिव भारतात आणण्याच्या प्रक्रियेसाठी वापरली जाईल.

ऑनलाइन नाव दिसण्याची वाट पाहू नका

MMRCC ने कुटुंबीयांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. बेपत्ता नातेवाईकाचे नाव नेपाळ पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर दिसण्याची वाट पाहू नका. पोर्टलवर संबंधित व्यक्तीची माहिती किंवा फोटो आढळला नाही, तरी MMRCC कडे बेपत्ता व्यक्तीचा अर्ज सादर करावा. त्यामुळे पुढील ओळख आणि पार्थिव हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती उपलब्ध राहण्यास मदत होईल.

अर्ज भरण्यासाठी मदत किंवा प्रक्रियेबाबत अधिक माहिती हवी असल्यास मनोज कुलकर्णी – 9325011719 किंवा अखिल काटकर – 9881099793 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >