Thursday, September 3, 2026

Shivpuri mysterious death 4 children : धबधब्यात पिकनिक अन् घरी परतताच भयंकर... एकामागून एक ४ मुलांचा रहस्यमय मृत्यू; शिवपुरीतील घटनेने खळबळ!

Shivpuri mysterious death 4 children : धबधब्यात पिकनिक अन् घरी परतताच भयंकर... एकामागून एक ४ मुलांचा रहस्यमय मृत्यू; शिवपुरीतील घटनेने खळबळ!

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपुरी (Shivpuri) जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी आणि अत्यंत रहस्यमय घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील १६ सदस्य पिकनिकसाठी धबधब्यावर गेले होते, मात्र तिथून परतल्यानंतर उद्भवलेल्या अनाकलनीय आजारपणामुळे अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत कुटुंबातील चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा आणि एका नातेवाईकाच्या मुलाचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सध्या कुटुंबातील इतर तीन मुलींची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

शिवपुरी येथील फिजिकल पोलीस ठाण्याच्या परिसरातील रहिवासी तन्वीर अहमद यांचे कुटुंब आणि काही नातेवाईक १६ ऑगस्ट रोजी गोरा टिला येथील धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. दिवसभर आनंद लुटल्यानंतर सर्वजण घरी परतले, परंतु काही वेळातच या आनंदाचे रुपांतर भीषण संकटात झाले. कुटुंबातील लहान मुलांना अचानक तीव्र ताप, पोटदुखी आणि अतिसाराचा (उलट्या-हगवण) त्रास सुरू झाला. सर्वात आधी १४ वर्षीय ताहिरची तब्येत खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एकामागून एक १९ वर्षीय अयाजसह इतर मुलांची प्रकृती बिघडत गेली आणि एकापाठोपाठ चार मुलांनी जीव गमावला.

एकाच घरातून अवघ्या १० दिवसांत चार मुलांचे मृतदेह बाहेर पडल्याने आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने तातडीने तन्वीर यांच्या घरी धाव घेतली आहे. धबधब्याच्या दूषित पाण्यामुळे किंवा तिथे झालेल्या संसर्गामुळे हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे; परंतु अद्याप याबाबत स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत. प्रशासनाने खबरदारी म्हणून धबधब्यावर गेलेल्या ६२ जणांचे वैद्यकीय नमुने (Samples) तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. वैद्यकीय अहवाल (Medical Report) आल्यानंतरच या रहस्यमय मृत्यूंमागचे खरे कारण स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >