Thursday, September 3, 2026

Nitish Rajput bigg boss : 'बिग बॉस २०' मध्ये होणार युट्युबर नितीश राजपूतची एन्ट्री ? पाकिस्तानने ज्याच्यावर घातली होती बंदी, नक्की आहे तरी कोण ?

Nitish Rajput bigg boss : 'बिग बॉस २०' मध्ये होणार युट्युबर नितीश राजपूतची एन्ट्री ? पाकिस्तानने ज्याच्यावर घातली होती बंदी, नक्की आहे तरी कोण ?

सलमान खानच्या सूत्रसंचालनाखाली सुरू होणाऱ्या 'बिग बॉस २०' या बहुचर्चित शोची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोची सुरुवात जवळ येत असतानाच, यामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या डिजिटल विश्वातील प्रसिद्ध युट्युबर नितीश राजपूत याचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. नितीश राजपूत या पर्वात स्पर्धक म्हणून दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे, मात्र शोच्या आयोजकांनी अजूनही अंतिम स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही.

कोण आहे युट्युबर नितीश राजपूत ?

नितीश राजपूत हा भारतातील एक प्रसिद्ध युट्युबर आणि संशोधक म्हणून ओळखला जातो. मनोरंजन विश्वातील नेहमीच्या कंटेंटपेक्षा वेगळे राहून तो देशातील सामाजिक समस्या, घडामोडी, सरकारी धोरणे, इतिहास आणि विविध वादग्रस्त विषयांवर सखोल संशोधन करून व्हिडिओ बनवतो. माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेतील सादरीकरणामुळे त्याने डिजिटल विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या नितीशने रुद्रपूर येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गौतम बुद्ध विद्यापीठातून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली. २०१३ मध्ये त्याने एका आयटी (IT) कंपनीत नोकरी सुरू केली, परंतु २०२० मध्ये ती सोडून त्याने युट्युबवर पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली. अतिशय कमी कालावधीत त्याने ३५ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला. सध्या त्याच्या युट्युब चॅनेलवर ८० लाखांहून (८ मिलियन) अधिक सबस्क्रायबर्स आहेत. हिंदी भाषेत माहितीपूर्ण कंटेंट तयार करणाऱ्या प्रमुख युट्युबर्समध्ये त्याचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करणे, त्यांना शिक्षित करणे आणि भारतीय समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे, हा आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश असल्याचे नितीश सांगतो. युट्युबशिवाय तो पॉडकास्ट आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही सक्रिय असतो.

नितीश राजपूतशी जोडलेले वाद

आपल्या कामामुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या नितीशला काही वादांचाही सामना करावा लागला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये एसएससी (SSC) परीक्षेच्या प्रक्रियेवर त्याने बनवलेल्या एका व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली होती. ही परीक्षा घेणाऱ्या 'एड्युक्युटी टेक्नॉलॉजीज' या कंपनीने नितीशवर दिशाभूल करणारी माहिती देऊन बदनामी केल्याचा आरोप करत २५ कोटी रुपयांचा दावा ठोकला होता. मात्र, आपला व्हिडिओ सरकारी कागदपत्रे आणि सार्वजनिक माहितीवर आधारित असल्याचा दावा नितीशने केला होता. त्याआधी, मे २०२५ मध्ये नितीशचा युट्युब चॅनेल पाकिस्तानमध्ये ब्लॉक करण्यात आल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. बलुचिस्तान विषयावर बनवलेल्या एका व्हिडिओनंतर पाकिस्तान सरकारच्या विनंतीवरून युट्युबने ही कारवाई केली होती, ज्याचे पुरावे नितीशने सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय भारतीय शिक्षण व्यवस्था, आर्यन खान प्रकरण, ओडिशा रेल्वे अपघात, अमृतपाल सिंग प्रकरण आणि जॅकलिन फर्नांडिस या विषयांवरील त्याच्या व्हिडिओंना ५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमनेही केले होते कौतुक

२०२४ मध्ये रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट दरम्यान बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने नितीश राजपूतच्या कामाचे भरभरून कौतुक केले होते. जॉन म्हणाला होता, "नितीश अतिशय उत्तम काम करतो. तो जे काही बोलतो त्याला ठोस पुरावे असतात. तो स्वतः सांगतो की, 'मी हे मनाचे सांगत नाहीये, तर हे अशा ठिकाणी लिहिले आहे, तुम्ही वाचू शकता.' तो अत्यंत सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्ती आहे. एवढा सखोल अभ्यास करून माहिती देणाऱ्या माणसाला ऐकताना खरोखरच फरक पडतो."

'बिग बॉस २०' बद्दल थोडक्यात माहिती

'बिग बॉस'चे विसावे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, यंदाच्या पर्वात काही नवीन आणि रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खानने 'एक्स्ट्रा जीवन दान' नावाच्या एका नव्या संकल्पनेची घोषणा केली आहे. यंदाच्या पर्वात नितीश राजपूत व्यतिरिक्त मेरी कोम, अमन गांधी, आम्रपाली दुबे, खुशी दुबे, रिया अहिर, गीता बसरा, फैझल खान, उदिती सिंग आणि कनिका मान यांसारखे दिग्गज चेहरे सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >