Thursday, September 3, 2026

CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीकडे नेण्याचा प्रयत्न!

CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीकडे नेण्याचा प्रयत्न!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत चुकीची

मुंबई : गणेशोत्सव अधिक पारंपारिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. डीजेच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत अयोग्य असून, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)

विधानभवनात पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांना पुण्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारण्यात आला. डीजेच्या विरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा पद्धतीने हल्ला करमे अजिबात योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद होणे योग्य नाही. या प्रकरणावर बोलताना त्यांनी गणेशोत्सवाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. आपला गणेशोत्सव हा पारंपारिक पद्धतीकडे नेला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, कदाचित पहिल्याच वर्षी शंभर टक्के यश मिळणार नाही, पण त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)

याशिवाय, पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी २४ तास काम करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी वर्षभर ही व्यवस्था सुरू राहणार असून, त्यासाठी एका समर्पित अधिकाऱ्याची (डेडिकेटेड ऑफिसर) नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. (CM Devendra Fadnavis)

दिशा सालियन प्रकरणावर भाष्य

बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केल्याच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आपली सखोल चौकशी पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर केला होता. मात्र, या तपासात काहीतरी तांत्रिक किंवा इतर बाबींची कमतरता असावी आणि त्यात आणखी काही सखोल तपास व्हावा, असे उच्च न्यायालयाला वाटले असावे. याच कारणातून न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे, यावर आता यापेक्षा अधिक काय बोलणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >