Friday, September 4, 2026

BCCI Action 62 Players : BCCI ची धडक कारवाई; रोहितसह ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी, अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्याचाही समावेश

BCCI Action 62 Players : BCCI ची धडक कारवाई; रोहितसह ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी, अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्याचाही समावेश

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वयाची खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदी सादर केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. बंगालचा युवा लेग-स्पिनर रोहित यादवसह (Rohit Yadav) तब्बल ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईच्या जाळ्यात २०२२ मधील 'अंडर-१९ विश्वचषक' विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचाही समावेश आहे. या धडक कारवाईमुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकाच खळबळ उडाली आहे.

रोहित यादवचे तीन जन्मदाखले अन् बनावट नोंदी उघड

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवणाऱ्या रोहित यादवच्या कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळल्या आहेत. जुलै महिन्यात पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान रोहितच्या कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आली. या तपासणीत त्याच्याकडे २००७, २००९ आणि २०१० अशी तीन वेगवेगळी जन्मवर्षे असलेले दाखले सापडले. इतकेच नाही तर, अधिकृत सरकारी ओळखपत्रातील जन्मतारीखदेखील वेळोवेळी बदलण्यात आल्याचे समोर आले. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) नोंदीनुसार त्याचे जन्मवर्ष २००७ होते, मात्र प्रत्यक्ष पुराव्यांमध्ये मोठा फरक आढळल्याने त्याला तात्काळ निलंबित करून प्रकरण बीसीसीआयकडे सोपवण्यात आले.

६२ खेळाडूंवर दोन वर्षांची गदा

बीसीसीआयने घेतलेल्या या कठोर निर्णयानुसार, दोषी आढळलेल्या सर्व ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. या कालावधीत हे खेळाडू कोणत्याही देशांतर्गत किंवा वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन्ही आगामी हंगामांतील नोंदणी आणि खेळाडू हस्तांतरणासाठी (Transfers) या सर्व ६२ जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. सर्व संबंधित राज्य क्रिकेट संघटनांना या निर्णयाची अधिकृत माहिती देण्यात आली असून सीएबीने आपल्या संकेतस्थळावर दोषी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

विश्वचषक विजेत्या रवी कुमारवरही कारवाई

या कारवाईत सर्वात मोठा धक्का म्हणजे २०२२ मध्ये भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज रवी कुमार याचाही या यादीत समावेश आहे. सीएबीच्या तपासणीत रवी कुमारच्या वयाच्या नोंदींमध्ये तब्बल ४५ महिन्यांचा (सुमारे पावणेचार वर्षांचा) फरक आढळला आहे. त्याच्यासोबतच डावखुरा फिरकीपटू विशाल भट्टी आणि इतर अनेक खेळाडूंच्या वयाच्या नोंदींमध्येही कित्येक वर्षांची तफावत आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमधील 'वय चोरी' आणि बनावट कागदपत्रांच्या गैरप्रकारांना मुळासकट उपटून टाकण्यासाठी बीसीसीआयने ही मोहीम तीव्र केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात वयाबाबत चुकीची माहिती देऊन ज्युनिअर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मोठा इशारा मिळाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >