Friday, September 4, 2026

Anna Bansode : दादर चैत्यभूमी - इंदूमिल रस्ता रुंदीकरणासाठी अंदाजपत्रक तातडीने तयार करा - अण्णा बनसोडे

Anna Bansode : दादर चैत्यभूमी - इंदूमिल रस्ता रुंदीकरणासाठी अंदाजपत्रक तातडीने तयार करा - अण्णा बनसोडे

मुंबई : दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. रस्त्याच्या जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेसाठी महसूल विभाग तसेच एमएमआरडीएचे अभिप्राय तत्काळ मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाठपुरावा करावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या. (Anna Bansode)

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तूप या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ६ डिसेंबर रोजी या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असून, त्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून याबाबत पाठपुरावा करावा. रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचे प्रस्ताव ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पाठवून संबंधितांनी प्रत्यक्ष जाऊन यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी. (Anna Bansode)

सध्याच्या रस्त्याच्या समुद्राकडील बाजूची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे आणि चैत्यभूमीपासून जी/उत्तर विभागातील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित भव्य स्मारकाला जोडल्यामुळे लाखो अनुयायांना याचा फायदा होईल. इंदूमिलपर्यंत रस्ता तयार करण्यासह रस्त्यालगतच्या परिसराचे सुशोभीकरण करणे, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. (Anna Bansode)

महसूल विभाग, पर्यावरण विभाग, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि एमएमआरडीएने या रस्त्याच्या उभारणीसाठी सकारात्मक कार्यवाही करावी. या कामाच्या प्रगतीचा आढावा पुढील महिन्यात संबंधित विभागांकडून घेण्यात येईल, असेही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी व चैत्यभूमी व्यवस्थापक समिती पदाधिकारी उपस्थित होते. (Anna Bansode)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा