Dhule : धुळ्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. मानव विकास योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या मालमोटारीने जोरदार धडक दिल्याने सुमारे ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा अपघात सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या सुमारास देऊर ते म्हसदी गावादरम्यान घडला. अपघातानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. जखमी विद्यार्थ्यांना नेर दूरक्षेत्र पोलिसांच्या मदतीने तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Dhule Bus Accident)
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानव विकास योजनेंतर्गत धुळे आगाराची एसटी बस क्रमांक एमएच ०६ एस ८५८९ ही पिंपरखेड ते म्हसदी या मार्गावर विद्यार्थ्यांची शालेय फेरी करत होती. या बसमध्ये सुमारे ४५ विद्यार्थी प्रवास करत होते. सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास देऊर–म्हसदी मार्गावरील एका वळणावर बस आली असता समोरून येणाऱ्या मालमोटारी क्रमांक एमएच १८ एए ५८८८ सोबत तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. अचानक झालेल्या या धडकेमुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडाने आणि मदतीसाठीच्या हाकांनी परिसर दणाणून गेला. या अपघातात बसमधील सुमारे ३० विद्यार्थी जखमी झाले. या अपघातातील जखमी विद्यार्थी म्हसदी येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय तसेच सी. डी. देवरे ज्युनिअर कॉलेजमधील असल्याची माहिती मिळाली आहे. (Dhule Bus Accident)
Nashik : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातुन खळबळजनक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत (Government Secondary Ashram School) इयत्ता ...
बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान
या धडकेत एसटी बसच्या पुढील काचेचे नुकसान होऊन ती फुटली आहे. तसेच बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. बसमधील रेडिएटर, पुढील बंपर, स्टेअरिंग बॉक्स ब्रॅकेट, इंटरकूलर, रेडिएटर टँक आणि एअर प्रेशर पाईपचे नुकसान झाले आहे. याशिवाय प्रवासी बाकड्यांचेही नुकसान झाले आहे. बसचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर मालमोटारीच्या पुढील भागाचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटी बसचे चालक पी. एन. वाणी आणि वाहक मनीषा विश्वास साळुंखे हे धुळे आगारातील कर्मचारी आहेत. या अपघातात वाहक मनीषा साळुंखे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. तर मालमोटार चालकाचे नाव वाहिद सत्तार पठाण असल्याची माहिती समोर आली आहे. (Dhule Bus Accident)
जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
अपघाताची माहिती मिळताच नेर दूरक्षेत्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळत जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश ढवळे यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एसटी बस आणि मालमोटारीची समोरासमोर धडक नेमकी कशामुळे झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.