Friday, September 4, 2026

Nepal Flood : नेपाळ पूरात बेपत्ता व्यक्तींच्या ओळखीसाठी भारताची फॉरेन्सिक मदत, डीएनए तपासणी मोफत

Nepal Flood : नेपाळ पूरात बेपत्ता व्यक्तींच्या ओळखीसाठी भारताची फॉरेन्सिक मदत, डीएनए तपासणी मोफत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातील पीडितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या आपत्तीत बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी भारतातील केंद्रीय आणि राज्यस्तरीय फॉरेन्सिक प्रयोगशाळांमध्ये डीएनए प्रोफाइलिंगची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपत्तीच्या या कठीण काळात भारत सरकारचा हा निर्णय पीडित कुटुंबीयांना आपल्या बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेण्यास आणि त्यांची ओळख पटवण्यास मोठी मदत ठरणार आहे. (Nepal Flood)

भारतात राहणाऱ्या बेपत्ता व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता व्यक्तीचे आई-वडील, मुलगा-मुलगी किंवा भाऊ-बहीण स्वतःचे जैविक नमुने देऊन डीएनए प्रोफाइल तयार करून घेऊ शकतात.ही तपासणी केंद्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा, राज्य फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा, राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ तसेच डीएनए प्रोफाइलिंगची सुविधा असलेल्या NABL-मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये केली जाणार आहे. (Nepal Flood)

नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ आणि खडकांचे मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे आलेल्या या अचानक पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक गावे आणि शहरांचे मोठे नुकसान झाले आहे. नेपाळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित भागांतून आतापर्यंत किमान 1,290 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (Nepal Flood)

मदत आणि बचाव पथके सातत्याने घटनास्थळी कार्यरत असून, आतापर्यंत 12,000 हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, परिस्थिती अद्याप गंभीर असून सुमारे 5,000 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे. (Nepal Flood)

काठमांडू येथील भारतीय दूतावासाने 26 ऑगस्ट रोजी आलेल्या या पुरातील पीडितांची ओळख पटवण्यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया आणि माहिती यापूर्वीच जारी केली होती. त्याचाच पुढील टप्पा म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतातील फॉरेन्सिक प्रयोगशाळांची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी ‘ऑटोसोमल एसटीआर डीएनए प्रोफाइलिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया नेपाळी अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या तांत्रिक गरजा आणि मानकांनुसारच पार पाडली जाणार आहे. (Nepal Flood)

ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांना मदत मिळावी यासाठी नेपाळी अधिकाऱ्यांनी हेल्पलाइन क्रमांक +977 9841 616095 जारी केला आहे.डीएनए प्रोफाइल पूर्णपणे तयार झाल्यानंतर, आवश्यक प्राथमिक माहितीसह ते नेपाळी अधिकाऱ्यांच्या अधिकृत ई-मेलवरdnacodis@nepalpolice.gov.np पाठवता येईल. त्यानंतर अज्ञात मृतदेहांच्या डीएनए नमुन्यांशी त्याची अचूक जुळवणी करून ओळख पटवण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते.

याशिवाय, काठमांडू येथील भारतीय दूतावासाशी योग्य समन्वय राखण्यासाठी डीएनए अहवालाची एक प्रत दूतावासाच्या eoikathmandufloodsupport@gmail.com या ई-मेलवरही पाठवता येणार आहे. (Nepal Flood)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >