Friday, September 4, 2026

Jalgaon Crime : मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून कुटुंबीयांनीच संपवलं ? महिनाभरानंतर आत्महत्येचं गूढ उकललं

Jalgaon Crime : मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून कुटुंबीयांनीच संपवलं ? महिनाभरानंतर आत्महत्येचं गूढ उकललं

Jalgaon Crime : जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीतील मोहाडी गावात ३१ जुलै रोजी घडलेल्या युवकाच्या कथित आत्महत्येच्या घटनेला तब्बल महिनाभरानंतर धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे समोर आलेल्या या घटनेचा तपास करताना पोलिसांसमोर वेगळेच सत्य उघड झाले आहे. दारूच्या व्यसनामुळे आणि त्याच्या कथित त्रासाला कंटाळून आई-वडील आणि भावानेच युवकाचा गळफास देऊन खून केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर खुनानंतर आत्महत्येचा बनाव करण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मयताच्या आईसह वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. (Jalgaon Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

३१ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास राधेशाम हरचंद राठोड या २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. राधेशामने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, घटनेची पार्श्वभूमी, घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध परिस्थितीजन्य बाबींची पडताळणी करताना पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. त्यामुळे ही घटना आत्महत्या असल्याचे गृहीत न धरता पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला.

पोलिसांच्या तपासात राधेशामला दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली. तो दारूच्या नशेत घरी आल्यानंतर आई-वडील आणि भावासोबत वाद घालत असल्याचा तसेच त्यांना मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. त्याच्या या वर्तनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दररोजच्या या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनी राधेशामचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानुसार आई, वडील आणि भावाने संगनमत करून त्याचा खून केल्याचा निष्कर्ष तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Jalgaon Crime News)

गळफास देऊन खून केल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, ३१ जुलै रोजी दुपारी राधेशामला तिन्ही संशयितांनी दोरीच्या साहाय्याने गळफास दिला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना आत्महत्येची असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. खून केल्यानंतर या घटनेत वापरण्यात आलेली दोरीदेखील तिन्ही संशयितांनी जाळून टाकल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

सुरुवातीला ही घटना आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, कुटुंबीयांचे जबाब आणि तपासातील इतर बाबींची बारकाईने पडताळणी केली. तपास पुढे सरकत असताना पोलिसांना कुटुंबीयांच्या कथनात काही विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर या विसंगतींची इतर परिस्थितीजन्य पुराव्यांशी पडताळणी करण्यात आली. चौकशी आणि तपासातून ही घटना आत्महत्या नसून आत्महत्येचा बनाव करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Jalgaon Crime News)

आई-वडिलांसह भावाला अटक

या प्रकरणी पोलिसांनी मयत राधेशामची आई मीराबाई हरसिंग राठोड, वडील हरसिंग उर्फ हरचंद नथ्यु राठोड आणि भाऊ सचिन हरसिंग राठोड, सर्व रा. मोहाडी, ता. जळगाव, यांना अटक केली आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुनाचा नेमका घटनाक्रम काय होता, तिघांची नेमकी भूमिका काय होती आणि या प्रकरणातील इतर परिस्थितीजन्य पुरावे कोणते आहेत, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >