Saturday, September 5, 2026

Mumbai Crime : मालाडमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; 19 जणांवर गुन्हा, 22 जणांची 14.83 लाखांची फसवणूक

Mumbai Crime : मालाडमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; 19 जणांवर गुन्हा, 22 जणांची 14.83 लाखांची फसवणूक

मुंबई :  मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात बांगूर नगर पोलिसांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुरिअर आणि ई-कॉमर्स कंपन्यांची लाइफटाईम फ्रँचायझी देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपींवर आरोप आहे. आतापर्यंत 22 जणांकडून तब्बल 14.83 लाख रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे. (Mumbai Police)

पोलिसांना मालाड परिसरात बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 2 सप्टेंबर रोजी बांगूर नगर पोलिसांनी मार्वे रोडवरील नूतन शाळेजवळ असलेल्या एम फिन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी कार्यालयात अनेक महिला आणि पुरुष नागरिकांना फोन करताना आढळून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मोबाईल फोन आणि WhatsAppच्या माध्यमातून संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधत होते. कंपनीचा Amazon, Flipkart, Myntra, Blue Dart, DTDC आणि BigBasket यांसारख्या मोठ्या ई-कॉमर्स व कुरिअर कंपन्यांसोबत करार असल्याचा दावा केला जात होता. या कंपन्यांची लाइफटाईम फ्रँचायझी मिळवून देण्याचे तसेच गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष ग्राहकांना दाखवले जात होते.

या आमिषाला बळी पडलेल्या ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना आश्वासनाप्रमाणे फ्रँचायझी किंवा व्यवसाय उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान कॉल सेंटरमधील मोबाईल फोन, संगणक आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

तपासात सोहनलाल गुप्ता हा संबंधित कंपनीचा मालक असल्याचे समोर आले. तसेच कंपनीचा प्रत्यक्षात केवळ एका कंपनीसोबतच व्यावसायिक करार असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, फसवणुकीची एकूण व्याप्ती आणि आणखी किती लोक या जाळ्यात अडकले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >