Saturday, September 5, 2026

Dahihandi 2026 : दहीहंडीच्या थरावर साकारली पावनखिंड; मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाच्या देखाव्याला दादरकरांची उत्स्फूर्त दाद

Dahihandi 2026 : दहीहंडीच्या थरावर साकारली पावनखिंड; मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाच्या देखाव्याला दादरकरांची उत्स्फूर्त दाद

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून, मुंबईतही ठिकठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याची परंपरा उत्साहात साजरी केली जात आहे. याच उत्साहात दादरमधील प्रसिद्ध आयडियल बुक डेपोसमोरील (Idol Book Depo Dahihandi) दहीहंडी उत्सवात मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथकाने (Shivsagar Govinda Pathak, Malad) आपल्या अनोख्या आणि ऐतिहासिक सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवसागर गोविंदा पथकाने यावेळी तीन थरांवर मानवी मनोरा उभारला आणि चौथ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पावनखिंडीच्या लढाईचा देखावा साकारला. या देखाव्यात शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची झलक प्रभावीपणे मांडण्यात आली.

दादर परिसरात हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गोविंदांच्या थरारक कसरतीसोबतच चौथ्या थरावर साकारलेला पावनखिंडीचा प्रसंग पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले. इतिहास केवळ पुस्तकांमध्ये न राहता तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा संदेश या सादरीकरणातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

विशेष म्हणजे, शिवसागर गोविंदा पथक गेल्या पाच वर्षांपासून दहीहंडी उत्सवात अशाच ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करत आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विषयाची देखाव्याची संकल्पना निवडून, मनोरंजनासोबतच समाजाला आणि तरुण पिढीला महत्त्वाचा संदेश देण्याचे काम या पथकाकडून केले जात आहे.

यापूर्वी या पथकाने महिलांवरील अत्याचार, अफजलखानाचा वध, ‘गड आला पण सिंह गेला’, तसेच ‘छावा’ अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखाव्याची संकल्पना सादर केली होती. यंदा त्यांनी पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढाईची देखाव्याची संकल्पना साकारत स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांच्या शौर्याला मानवंदना दिली. दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर रचण्याचा थरार तर पाहायला मिळतोच; मात्र त्यासोबत इतिहास, सामाजिक प्रश्न आणि प्रेरणादायी संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शिवसागर गोविंदा पथकाचा हा प्रयत्न विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >