पुणे : पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रियेत क्रीडा आरक्षणाचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कुराश आणि ड्रॅगन बोट या क्रीडा प्रकारांची बनावट प्रमाणपत्रे सादर करून 19 उमेदवारांनी 5 टक्के क्रीडा आरक्षणातून पोलीस दलात नोकरी मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असून दोन क्रीडा पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून काही उमेदवारांना क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
बीड : बीडच्या अंबाजोगाई येथील 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांची कहाणी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अंगावर साधी साडी, पायात स्लीपर आणि मनात मुलींच्या ...
पोलिसांच्या तपासात काही क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात झाल्याचे पुरावे आढळले नसल्याचे समोर आले आहे. मात्र, या स्पर्धांमध्ये उमेदवार सहभागी झाल्याचे दाखवणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा संशय आहे. जुन्या तारखांचे सहभाग प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे संबंधित उमेदवारांची क्रीडा प्रमाणपत्रे पडताळून देण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांकडून मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याचा संशय असून, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. काही प्रकरणांमध्ये प्रमाणपत्रांसाठी 3 ते 5 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेचे पालन झाले होते का, याचीही चौकशी केली जाणार आहे. क्रीडा विभागाकडून या प्रकरणाची स्वतंत्र तपासणी होण्याची शक्यता आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या 19 उमेदवारांचीही चौकशी होणार असून, तपासानंतर त्यांच्याविरोधात पुढील कारवाई केली जाऊ शकते.