Saturday, September 5, 2026

Suryakumar Yadav Thane Dahi Handi : सूर्याच्या एकाच डायलॉगवर ठाणेकर फिदा, म्हणाला... वर्तकनगरमध्ये गोविंदा पथकांचा जल्लोष

Suryakumar Yadav Thane Dahi Handi : सूर्याच्या एकाच डायलॉगवर ठाणेकर फिदा, म्हणाला... वर्तकनगरमध्ये गोविंदा पथकांचा जल्लोष

ठाणे : राज्यभरात आज गोपाळकाळाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गोविंदा आला रे'च्या घोषात ठाणे शहर दुमदुमून गेले आहे. टेंभी नाका, तलावपाळी ते वर्तकनगर अशा विविध भागांतील मानाच्या दहीहंड्यांवर मानवी मनोऱ्यांचा थरार पाहायला मिळत आहे. या उत्सवाच्या वातावरणात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने लावलेल्या विशेष हजेरीने गोविंदांचा आणि प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.

संस्कृती प्रतिष्ठानच्या हंडीत २५ लाखांचे आव्हान

आमदार प्रताप सरनाईक यांच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'तर्फे वर्तकनगर येथे आयोजित करण्यात आलेली दहीहंडी यंदा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अभिजात मराठी भाषेचा सन्मान करण्याचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीत विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय १० थर रचणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाणार असून, इतर थरांसाठीही आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आल्याने पथकांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

"कसं काय ठाणे ?" सूर्याचा खास मराठी अंदाज

सूर्यकुमार यादव मंचावर येताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट करत त्याचे स्वागत केले. माईक हातात घेताच सूर्याने आपल्या नेहमीच्या भन्नाट अंदाजात प्रेक्षकांशी संवाद साधला. "कसं काय ठाणे? आवाज येत नाही तुमचा... जोरात आवाज झाला पाहिजे!" असे म्हणत त्याने संपूर्ण मैदानात एकच जोश निर्माण केला. यानंतर या सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल त्याने आयोजक प्रताप सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.

'प्रो गोविंदा'ला ऑलिम्पिकमध्ये नेण्याचे स्वप्न

यावेळी बोलताना सूर्यकुमारने गोविंदा खेळाचे कौतुक केले आणि या पारंपरिक खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आवाहन केले. "आपला 'प्रो गोविंदा' हा एक खरा देशी खेळ आहे. या खेळाला आता ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जायचे आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मोठी मेहनत घ्यावी लागेल," असा विश्वास त्याने व्यक्त केला.

'इतिहास घडवायचा तर वेड लागलंच पाहिजे!'

आपल्या क्रिकेटमधील अनुभवाचा दाखला देत सूर्याने गोविंदांना विजयाचा मंत्र दिला. तो म्हणाला, "आम्ही क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की, कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तिचे वेड असावे लागते. कारण जर आपल्याला इतिहास घडवायचा असेल, तर ते वेड लागणे अत्यंत गरजेचे आहे." सूर्यकुमारच्या या रोखठोक आणि प्रेरणादायी वक्तव्याने वर्तकनगरच्या मैदानातील हजारो गोविंदांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास भरला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >