Saturday, September 5, 2026

Dahi Handi 2026 : ‘गोविंदा आला रे आला!’; मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष, ढोल-ताशांचा निनाद अन् गोविंदांचा जोश

Dahi Handi 2026 : ‘गोविंदा आला रे आला!’; मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष, ढोल-ताशांचा निनाद अन् गोविंदांचा जोश

मुंबई : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात आज दहीहंडीचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला. गोविंदा पथकांनी एकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्याचे थरारक आव्हान स्वीकारले. ठाण्यात सकाळपासूनच दहीहंडी उत्सवाची लगबग सुरू झाली होती. विविध गोविंदा पथकांचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन होताच परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. ‘गोविंदा आला रे’च्या घोषणांनी आणि पारंपरिक वाद्यांच्या तालाने शहर दुमदुमून गेले. (Dahi Handi 2026)

दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी मानवी मनोरे रचले. काही पथकांना पहिल्याच प्रयत्नात हंडी फोडण्यात यश आले, तर काही ठिकाणी थर कोसळल्यानंतर गोविंदांनी पुन्हा जोमाने मनोरे उभारले. त्यामुळे दहीहंडीच्या मैदानात चुरस आणि थरार पाहायला मिळाला. (Dahi Handi 2026)

लाखोंची बक्षिसे आणि विक्रमांची चुरस

यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मोठ्या रकमेची बक्षिसे आणि विक्रमांचे आव्हान. मानाच्या दहीहंड्यांवर लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, ती पटकावण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. ठाण्यातील काही दहीहंड्यांसाठी तर ७१ लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. (Dahi Handi 2026)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील प्रमुख दहीहंडी उत्सवांमध्ये सेलिब्रिटी आणि मान्यवरांची उपस्थितीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे गोविंदा पथकांचा उत्साह आणखी वाढला. ढोल-ताशांचा निनाद, गोविंदांच्या घोषणा आणि उंचच उंच मानवी मनोरे अशा उत्सवी वातावरणात यंदाची दहीहंडी रंगली. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर आज ‘मच गया शोर सारी नगरी रे...’ म्हणत गोविंदांच्या थरारक खेळीचा अनुभव पाहायला मिळाला. (Dahi Handi 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >