ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेली परंपरा आणि ठाण्याच्या गोविंदा संस्कृतीची ओळख असलेली टेंभी नाका येथील मानाची दहीहंडी यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाली. या दहीहंडीला सलामी देण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सवातील थरांपेक्षा गोविंदांमधील एकजूट आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश दिला. “हंडी फोडा, पण माणूस जपा,” या भूमिकेतून त्यांनी गोविंदांना भावनिक आवाहन केले. (Eknath Shinde)
टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे बोलत होते. टेंभी नाक्याची दहीहंडी ही केवळ एक स्पर्धा नसून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेल्या परंपरेची आणि ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीची मानाची खूण आहे. या दहीहंडीला सलामी देऊन गोविंदा पुढील दहीहंड्यांकडे जातात. त्यामुळे या उत्सवाला ठाण्यात विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
“गोविंदा हा एकजुटीचा उत्सव आहे. खालच्या थरावरचा गोविंदा, त्याच्यावरचा थर आणि त्यावरचे थर अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून दहीहंडीचा थर उभा राहतो. म्हणूनच गोविंदामध्ये टीमवर्क आणि एकजूट महत्त्वाची आहे,” असे शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)
मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी फोडताना विटांचा खांब कोसळून त्याखाली दबून 7 ...
ठाणे ही गोविंदाची पंढरी म्हणून ओळखली जाते. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जपलेली उत्सवाची ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे. ठाण्यातील दहीहंडीचा उत्साह आता राज्यभर पोहोचला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde)
गोविंदा उत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा, सार्वजनिक सुट्टी तसेच गोविंदांचा विमा अशा माध्यमातून या पारंपरिक खेळाला संस्थात्मक पाठबळ देण्यात आले आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदाला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिंदे यांनी गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा विशेषत्वाने मांडला. “आपले आई-वडील आपल्या घरी वाट पाहत आहेत. त्यामुळे दहीहंडीचा उत्साह साजरा करताना आपल्या सहकाऱ्याला दुखापत होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्या,” असे आवाहन त्यांनी केले. (Eknath Shinde)
दहीहंडी ही जीवघेणी स्पर्धा नसून आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्साहासोबत शिस्त, संयम आणि परस्परांची काळजी घेणे आवश्यक आहे. थर किती उंच गेला यापेक्षा तो उभारताना प्रत्येक गोविंदा सुरक्षित राहिला का, हे अधिक महत्त्वाचे आहे, असा संदेश त्यांच्या भाषणातून देण्यात आला.
मुंबई : दहिहंडीचा उत्साह आणि जल्लोष सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकांचा थरार, उंचच उंच मानवी मनोरे आणि ढोल-ताशांच्या गजरात दहिहंडी ...
मुख्यमंत्री असताना सण-उत्सवांवर निर्बंध असलेल्या काळाची आठवण करून देताना शिंदे यांनी सांगितले की, सण-उत्सवांचा जल्लोष पुन्हा सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर गोविंदा उत्सव पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज ठाण्यापासून राज्याच्या विविध भागांत मोठ्या संख्येने गोविंदा पथके या उत्सवात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
टेंभी नाका मित्रमंडळाच्या वतीने गोविंदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व गोविंदा पथकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही शिंदे यांनी सांगितले. उत्साह, परंपरा, एकजूट आणि सुरक्षिततेचा संदेश देत त्यांनी राज्यातील सर्व गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. (Eknath Shinde)
यावेळी उबाठा गटाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला. तर अभिनेते गोविंदा, अभिनेता सिद्धार्थ जाधव, दत्तू मोरे असे अनेक कलाकार या गोविंदा उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, निखिल बुडजडे, स्वानंद पवार, जॅकी भोईर आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Eknath Shinde)






