Saturday, September 5, 2026

Mumbai Weather Update : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! तलावांत ९५.८९% पाणीसाठा, पण महापालिकेने दिला 'हा' इशारा

Mumbai Weather Update : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! तलावांत ९५.८९% पाणीसाठा, पण महापालिकेने दिला 'हा' इशारा

मुंबई : सप्टेंबर महिना उजाडला तरी मुंबईत पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. शनिवारी दिवसभर शहरासह उपनगरांत ढगाळ हवामान आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. एका बाजूला दमदार पावसामुळे मुंबईची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली असली, तरी दुसरीकडे समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबईची तहान भागवणारे तलाव फुल!

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा (हायड्रोलिक इंजिनिअरिंग) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराला पाणी पुरवणाऱ्या सातही प्रमुख तलावांमध्ये सध्या ९५.८९% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. या तलावांमध्ये एकूण १३,८७,८३९ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असून, यामुळे मुंबईकरांचा पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

कोणत्या तलावात किती पाणी ?

वेहार : १००% (पूर्ण क्षमतेने भरले)

मोडक सागर : ९८.४७%

तानसा : ९८.२४%

मिडल वैतरणा : ९७.०८%

तुळशी : ९६.७९%

भातसा : ९५.९८% (मुंबईला सर्वाधिक पाणी देणारा तलाव)

अप्पर वैतरणा : ९१.०७%

(टीप: यातील वेहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर हे चार तलाव जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो झाले होते.)

पुढील दोन दिवसांचे भरती-ओहोटीचे वेळापत्रक

मुसळधार पाऊस आणि समुद्राची भरती एकाच वेळी आल्यास शहरात पाणी साचण्याचा धोका वाढतो. यासाठी पालिकेने भरतीच्या वेळा जाहीर केल्या आहेत:

शनिवार, ५ सप्टेंबर :

भरती (High Tide): संध्याकाळी ५:११ वाजता (लाटांची उंची: ३.१२ मीटर)

ओहोटी (Low Tide): मध्यरात्री १२:१० वाजता (लाटांची उंची: १.३६ मीटर)

रविवार, ६ सप्टेंबर:

भरती (High Tide): सकाळी ७:५५ वाजता (लाटांची उंची: ३.५१ मीटर)

ओहोटी (Low Tide): दुपारी १:५५ वाजता (लाटांची उंची: २.३५ मीटर)

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यांवर जाणे टाळावे आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी पालिकेच्या १९१६ या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >