Saturday, September 5, 2026

Operation Ashdar : 'पळू शकता, पण लपून राहू शकत नाही!'; बुडगाममध्ये 'ऑपरेशन अशदर' अंतर्गत लष्कर-ए-तय्यबाचा पाकिस्तानी दहशतवादी ठार

Operation Ashdar : 'पळू शकता, पण लपून राहू शकत नाही!'; बुडगाममध्ये 'ऑपरेशन अशदर' अंतर्गत लष्कर-ए-तय्यबाचा पाकिस्तानी दहशतवादी ठार

बुडगाम : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बुडगाम जिल्ह्यात (Budgam) सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका मोठ्या संयुक्त मोहिमेत 'लष्कर-ए-तय्यबा' (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. 'ऑपरेशन अशदर' (Operation Ashdar) या नावाने चालवण्यात आलेल्या या मोहिमेत ठार झालेल्या या दहशतवाद्याची ओळख 'यासीर' अशी पटली असून तो मूळचा पाकिस्तानचा नागरिक होता. या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी सोशल मीडियावर देशविरोधी घटकांना कडक इशारा देत, "तुम्ही पळू शकता, पण लपून राहू शकत नाही!" असा सणसणीत संदेश दिला आहे.

अशी झाली चकमक

सुरक्षा यंत्रणांना बुडगाममधील अशदर गली परिसरात काही दहशतवादी लपल्याची पक्की गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय सैन्याची चिनार कॉर्प्स (Chinar Corps), जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ (CRPF) यांच्या संयुक्त पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. सुरक्षा दलांनी आव्हान दिले असता लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचा हा परदेशी दहशतवादी ठार झाला.

एके-४७ रायफल आणि दारूगोळा जप्त

चकमकीनंतर राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान घटनास्थळावरून एक एके-४७ (AK-47) रायफल आणि मोठ्या प्रमाणावर लष्करी सामग्री व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी नेटवर्कसाठी या परदेशी दहशतवाद्याचा खात्मा हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

स्थानिक नेटवर्कचा शोध सुरू

ठार झालेला दहशतवादी यासीर या भागात किती दिवसांपासून सक्रिय होता आणि त्याला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली होती का, याचा कसून तपास सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत. या मोहिमेनंतरही संपूर्ण अशदर गली परिसरात सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरूच असून संपूर्ण परिसराला लष्कराने वेढा घातला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >