Saturday, September 5, 2026

Ramabai Ranvir : मुलीच्या शिक्षणासाठी चप्पल काढून धावल्या; 47 वर्षीय रमाबाईंची जिद्द पाहून देशभरातून मदतीचा हात

Ramabai Ranvir : मुलीच्या शिक्षणासाठी चप्पल काढून धावल्या; 47 वर्षीय रमाबाईंची जिद्द पाहून देशभरातून मदतीचा हात

बीड : बीडच्या अंबाजोगाई येथील 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांची कहाणी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अंगावर साधी साडी, पायात स्लीपर आणि मनात मुलींच्या शिक्षणाची चिंता असताना रमाबाईंनी धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. मुलीच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची गरज असल्याने त्यांनी ही शर्यत जिंकण्याचा निर्धार केला आणि अखेर पहिला क्रमांक पटकावला.

मुलींच्या भविष्यासाठी धावल्या

29 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई येथील खोलेश्वर शैक्षणिक संकुलात ही धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 30 वर्षांवरील महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या 2 किलोमीटरच्या या शर्यतीत 102 स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्याला 3,000 रुपयांचे बक्षीस मिळणार होते. हे पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतील, या विचाराने रमाबाईंनी स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला.

स्पर्धेत अनवाणीच धावल्या

शर्यतीदरम्यान सुरुवातीला काही तरुण स्पर्धक रमाबाईंपेक्षा पुढे गेले. मात्र पावसामुळे त्यांची स्लीपर वारंवार निसटू लागली. अखेर त्यांनी स्लीपर हातात घेतल्या आणि अनवाणीच धावण्यास सुरुवात केली. रस्त्यावर चिखल, खडे आणि दगड असतानाही त्यांनी वेग कमी केला नाही. अखेर त्यांनी शर्यत जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अनेककांडून मदतीचा हात

या शर्यतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. क्रिकेटपटू आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही रमाबाईंची कहाणी शेअर केली. त्यानंतर त्यांच्या जिद्दीची चर्चा देशभर झाली.

रमाबाईंची परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच सचिन तेंडुलकर यांच्या कंपनीकडून त्यांच्याशी संपर्क साधून बुटांचा आकार विचारण्यात आला असून, त्यांना रनिंग शूज देण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. देशाच्या विविध भागांतून लोकांनीही त्यांच्या खात्यात आर्थिक मदत पाठवली. एका आठवड्यात त्यांच्या खात्यात 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.

रमाबाई घरकाम आणि स्वयंपाकाची कामे करून महिन्याला सुमारे 9,000 रुपये कमावतात. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी त्या एकट्याच सांभाळत आहेत. त्यांची एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत असून दुसरी मुलगी BSc ITचे शिक्षण घेत MPSCची तयारी करत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी अधिक चांगले मार्गदर्शन आणि अभ्यासाचे साहित्य मिळावे, हीच रमाबाईंची इच्छा आहे.

रमाबाईंच्या या धावण्यामागे केवळ स्पर्धा जिंकण्याची इच्छा नव्हती, तर आपल्या मुलींच्या भविष्यासाठी काहीतरी करण्याची धडपड होती. त्यामुळेच त्यांची ही कहाणी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >