Sunday, September 6, 2026

IIT Admission Scam : IITमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली १६.५ लाखांची फसवणूक; बनावट SIM पुरवणाऱ्या रॅकेटचा पवई पोलिसांकडून पर्दाफाश

IIT Admission Scam : IITमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली १६.५ लाखांची फसवणूक; बनावट SIM पुरवणाऱ्या रॅकेटचा पवई पोलिसांकडून पर्दाफाश
मुंबई : बनावट इंजिनिअरिंग अ‍ॅडमिशनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला अनधिकृतपणे सक्रिय केलेले SIM कार्ड पुरवल्याच्या आरोपावरून पवई पोलिसांनी एका SIM गॅलरीतील सेल्स एक्झिक्युटिव्हला अटक केली आहे. अबू सैफ (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या प्रकरणातील तो ११वा आरोपी आहे. हे प्रकरण १७ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, सैफ हा पश्चिम उपनगरातील एका SIM गॅलरीत काम करत होता. त्याने २०२६ मध्ये योग्य कागदपत्रांशिवाय सुमारे ३०० SIM कार्ड पुरवल्याचा आरोप आहे. यासाठी तो प्रत्येक SIM कार्डमागे १ हजार ते २ हजार रुपये घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत २३ SIM कार्डची ओळख पटवली असून, ही कार्ड योग्य KYC पडताळणीशिवाय जारी करण्यात आल्याचा आरोप आहे.

ग्राहकांच्या KYCचा गैरवापर

पोलिसांच्या आरोपानुसार, खराब झालेल्या SIM कार्डच्या बदलासाठी किंवा नवीन कनेक्शन घेण्यासाठी गॅलरीत येणाऱ्या ग्राहकांच्या माहितीचा सैफ गैरवापर करत होता. KYC प्रक्रियेच्या नावाखाली ग्राहकांचे फोटो घेतल्यानंतर त्यांच्या तपशीलांचा वापर करून ग्राहकांच्या माहितीशिवाय अतिरिक्त SIM कार्ड सक्रिय करण्यात येत होते. या SIM कार्डसाठी बनावट पत्त्यांचा वापर केल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. ही SIM कार्ड बनावट इंजिनिअरिंग अ‍ॅडमिशन रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या फसवणूक करणाऱ्यांकडून वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून जारी केलेली SIM कार्डे पुढे फसवणुकीसाठी वापरली गेल्याचा पोलिसांचा दावा आहे.

डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास

पश्चिम विभाग-३ चे DCP दत्ता नलावडे यांच्या माहितीनुसार, पोलिसांच्या डिटेक्शन टीमने सुमारे महिनाभर या रॅकेटचा तपास केला. यासाठी बँक ATM व्यवहार, पेट्रोल पंपावरील व्यवहार आणि पीडितांकडून जमा झालेल्या पैशांचा मागोवा घेण्यात आला. दरम्यान, पवईतील एका महिलेची तिच्या मुलाला IIT हैदराबादमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने १६.५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संबंधित रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने बँकेला दिले आहेत. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार युवराज शर्मा (वय ३२) याच्यासह अन्य नऊ आरोपींना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. प्रत्येकाला २५ हजार रुपयांच्या रोख हमीवर जामीन देण्यात आला असून, त्यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली आहे. दरम्यान, अबू सैफ सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >