Saturday, September 5, 2026

DahiHandi 2026 : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; थरावरून कोसळल्याने नवी मुंबईत गोविंदाचा बळी

DahiHandi 2026 : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; थरावरून कोसळल्याने नवी मुंबईत गोविंदाचा बळी
नवी मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना मुंबई आणि नवी मुंबईतून दोन अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. थरावरून कोसळल्यामुळे आणि अपघातामुळे दोन गोविंदांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात एका 34 वर्षीय तरुणासह एका 7 वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहिली घटना नवी मुंबईतील घणसोली भागात घडली. देविदास सौगुळे दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमात मानवी मनोरे रचत असताना अचानक थर कोसळले. या दुर्घटनेत घणसोली गाव कोळीवाडा येथे राहणारे स्वप्निल सदानंद नावर हे 34 वर्षीय गोविंदा गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत ७ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दुसरी घटना मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील मालवणी येथे घडली. एकता वेल्फेअर सोसायटी परिसरात स्थानिक लहान मुले स्वतःहून दहीहंडी साजरी करत होती. दहीहंडी बांधण्यासाठी दोरी एका झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आली होती. हंडी फोडण्याच्या प्रयत्नात दोरीचा ताण आल्याने विटांचा खांब अचानक कोसळला. हा खांब 7 वर्षांच्या रुद्र कदम या चिमुरड्याच्या थेट डोक्यावर पडला. गंभीर जखमी झालेल्या रुद्रला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सणाचा उत्साह सुरू असताना घडलेल्या या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >